एलआयसीच्या खासगीकरणाविरोधात सर्व कर्मचारी आज संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lic-logo

एलआयसीच्या खासगीकरणाविरोधात आज 18 मार्च रोजी सर्व कर्मचाऱयांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली देशभरातील विमा कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रस्तावित विमा कायद्यातील बदलांमार्फत देशात चांगली कामगिरी करणाऱया आयुर्विमा महामंडळाचे एलआयसी कायद्यात रूपांतर करून एलआयसीचे भागभांडवल खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्याचा डाव आखला जात असून याविरोधात कर्मचाऱयांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय विमा कर्मचारी सेना नवीन आर्थिक धोरणाचा खासकरून सार्वजनिक विमा व्यवसाय व एलआयसीच्या खासगीकरणाविरुद्ध गेली दोन दशके लढा देत आहे. संसदेतील खासदारांकडेही या विषयासंदर्भात लोकसभेत विरोध करण्यासाठी विनंती केल्याचे कर्मचारी सेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. एलआयसीने सरकारच्या विविध योजनांमध्ये आजवर 25 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच 5 कोटींच्या भांडवल गुंतवणुकीच्या परतावा रूपाने 28 हजार कोटी रुपये दिले. एलआयसीचा लाईफ फंड व इतर जमा निधी सुमारे 30 लाख कोटी रुपये असून स्थावर मालमत्ता सुमारे 25 लाख कोटींची आहे. अशी सर्वोत्कृष्ट कंपनी खासगी धोरणांतर्गत कवडीमोल दराने विकण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप कर्मचारी सेनेने केला आहे.

– केंद्र सरकार उद्दामपणे एलआयसी खासगीकरणाचा प्रयत्न करीत असून याविरोधात संप हे आता शेवटचे हत्यार असून या संपात एलआयसीतील सर्व कर्मचारी, विकास अधिकारी सहभागी होणार आहेत.