
>> जोसेफ तुस्कानो
बालसाहित्य हे मुलांच्या मनाच्या कोऱया पाटीवर संस्कार कोरणारे एक साधन आहे. त्यामुळे ते महत्त्वपूर्ण ठरते. मराठीतून शिक्षण देणाऱया शाळांची घटलेली संख्या, व्यवहारात कमी झालेला राज्यभाषेचा वापर आणि विविध प्रकारच्या प्रशिक्षण वर्गामध्ये अडकलेले विद्यार्थी यांचा मराठी बालसाहित्यावर विपरीत परिणाम होत आहे व बालवाचक कमी होत आहेत.
मुलांनी वाचते व्हावे यात एकनाथ आव्हाड खूपसे आघाडीवर असलेले बालकवी आहेत. डझनभर बालकविता संग्रह, अर्धा डझन बालकथा संग्रह,चारित्र्य लेखन, काव्यकोडी, अनुवाद, नाटय़छटा अशा विविधांगी आणि नाना रंगी साहित्यिक अपत्याचे ते धनी आहेत. बालकविता हा त्यांचा आवडीचा प्रांत आहे. बालकविता म्हणजे ‘ट’ला ‘ट’ची जुळवणूक नसते, तर त्या बालसुलभ अक्षरांतून आशय व्यक्त करायचा असतो. तो मुलांच्या मनाला भिडवायचा असतो. त्यांना त्या कविता गाव्याशा वाटल्या पाहिजेत. त्यासाठी त्यात नाद, गेयता असणे गरजेचे असते. एकनाथ सरांच्या कविता या निकषाला उतरतात नि म्हणूनच ते छोटय़ा दोस्ताचे आवडते कवी बनून आहेत. माणूस प्रेम करतो तेव्हा तो कवी बनतो, असं प्लेटो म्हणत. एकनाथ सरांच्या बाबतीत तसंच काहीसे झालं आहे नि ते झपाटून बाळगोपाळासाठी कविता लिहीत आहेत.
भाषा जिवंत असते व ती तशीच साहित्यात उतरायला हवी. भाषा नानाविध रंग आणि गंध घेऊन येत असते. ती सहज आणि भिडणारी असावी. हे कसब सगळ्यांठायी नसते. त्यासाठी आपण बोलतो त्या भाषेवर आपलं प्रेम असावे लागते. तिला साहित्यात सन्मानाने आणायचे असते. रुजवायचे असते. मुलांसाठी लिहिताना ही गोष्ट आवर्जून केली पाहिजे. आज ‘स्मार्ट’ बनलेल्या बालपिढीला आटपाटनगर, राजा-राणी-राजपुत्र, राक्षस, भूत, परी…या कालबाह्य विषयांत रस वाटत नसतो, त्यांना विज्ञान-गोष्टी, चरित्रे, पर्यावरण, साहस, खेळ यात गुंतविता येते. तरीही बालसाहित्यात ललित, विज्ञान, शालेय असे भेदाभेद न करता मराठी भाषा व रंजकता हे अंतिम निकष ठेवायला हवेत.
व्याकरण भाषेचा आत्मा असतो. ते गणितासारखे असते. ते जेव्हा काव्यातून समजावून दिले जाते तेव्हा मुलांच्या सहज गळी उतरते. ही कला एकनाथ सरांना सहज अवगत झालेली आहे. त्यांच्या ‘शब्दांची नवलाई’ या नव्या बालकविता संग्रहात त्याचा प्रत्यय येतो. क्रियापदे, चिन्हे, विशेषणे, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, म्हणी, सामान्य नाम, शिष्टाचार, ध्वनिदर्शक शब्द, सुवचने, कोडी यांची महती गंमत जंमत पद्धतीने मुलांना गायला लावणे हे कसब त्यांना मस्तपैकी साधले आहे. त्यांनी कवितांतून केलेले आईचे वात्सल्य, मैत्रीची गोष्ट, निसर्गाचे गीत यांची केलेली भलावण छोटय़ा मित्रांना भावणारी आहे. एकनाथ सर मुलांची जवळीक साधण्यात यशस्वी ठरले आहेत.
एकनाथ सरांच्या कविता या विज्ञान कवितांकडे झुकलेल्या वाटतात. उदाहरण द्यायचं तर ‘प्रकाशगाणे’ कवितेत ते लिहितात…
आनंद, मोदे, हर्षाचे सोने
भरभरून साऱयांना द्यावे
जीवित, आयुष्य, जीवन सारे
समाधानाने बहरून यावे
किंवा ‘आपला हात जगन्नाथ’ कवितेत ,ते मुलांना समजावून देतात…
‘संकट धावून आले
हातपाय गाळून बसू नये
संकटाशी दोन हात करावे
संकटापुढे हात टेकू नये’
पुस्तके महितींनी युक्त असतात व त्या माहितीवर आपापल्या परीने मनन होते तेव्हा ज्ञानप्राप्ती होत जाते. बालसाहित्य या तर कल्पनाविश्वातील भराऱया होत. पुस्तके म्हणजे जग, निसर्ग, समाज, मित्र यांच्याशी जवळीक साधून देणारे अमोघ व सुलभ साधन होय. जर मुलांचे भावी आयुष्य कर्तृत्वसंपन्न व यशस्वी व्हायचे असेल तर लहान वयात त्यांना वाचनाची गोडी लागायला हवी. बालकथा नि कविता बालकांवर नैतिक, भाषिक, बौद्धिक संस्कार करतात. मुलांच्या वाढीत जसं शाळा आणि पालकांचं योगदान महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं काम बालसाहित्य करते हे विसरून कसं चालेल?
मराठीत बालसाहित्याचा सेतू उभारण्यात हातभार लावणारे एकनाथ सरांचे बालसाहित्य आहे.
शब्दांची नवलाई
कवी – एकनाथ आव्हाड
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन
पृष्ठs – 64, मूल्य – रुपये 150/-





























































