
पश्चिम बंगालच्या विधानसभा निकडणुकीसाठी भाजपने रविकारी आपला वचननामा जाहीर केला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींशी टक्कर देताना भाजपने महिलांची सुरक्षा व त्यांच्या सबलीकरणाचा नारा दिला आहे. याच अनुषंगाने महिलांना सरकारी नोकरीत 33 टक्के आरक्षण, केजी टू पीजी मोफत शिक्षण तसेच सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मोफत प्रवास अशी आश्वासनांची खैरात केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारीरी कोलकात्त्यामध्ये पक्षाचा निवडणूक वचननामा जाहीर केला. या वेळी त्यांनी बंगालच्या जनतेला आवाहन करताना आम्हाला फक्त पाच वर्षे द्या, बंगालचे सोने करू, असा दावा केला.
भाजपने आपल्या वचननाम्याला ‘सोनार बांगला संकल्प पत्र’ म्हटले आहे. किसान सन्मान निधीअंतर्गत 75 लाख शेतकऱयांच्या बँक खात्यात 18 हजार रुपये एकाचवेळी कोणतीही कपात न करता जमा करणार असल्याचे शहा यांनी जाहीर केले. मागील तीन वर्षांत ममता बॅनर्जींनी शेतकऱयांना हे पैसे दिले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
पहिल्याच कॅबिनेटमध्ये सीएए लागू करणार
राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू केला जाईल. मागील 70 वर्षे इथे राहत असलेल्या शरणार्थींना नागरिकत्व दिले जाईल. यातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 10 हजार रुपये दिले जातील, असेही अमित शहा यांनी जाहीर केले.



























































