
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ची धाड पडल्यास अनेकांची तारांबळ उडते, पण राजस्थानमधील एका तहसीलदाराने एक वेगळीच आयडियाची कल्पना लढवीत उभ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. एसीबीच्या जाळ्यात अडकू नये म्हणून या तहसीलदाराने स्वतःला घरात कोंडून घेत 20 लाख रुपयांची रोख स्टोव्ह पेटवून जाळून टाकल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी एसीबीने या तहसीलदाराला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
राजस्थानमधील सिरोही जिह्यामधील ही घटना आहे. सरकारी कंत्राट मिळावे म्हणून कल्पेश कुमार जैन यांनी 20 लाख रुपयांची लाच घेतल्याची माहिती पुढे आली होती. याप्रकरणी एसीबीने प्रथम जमीन अभिलेख निरीक्षक परबत सिंहला एक लाखाची लाच देऊ केली होती. ही लाच घेताना एसीबीने परबत सिंहला अटक केली. परबत सिंहकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी कल्पेश कुमार जैन याला अटक करण्यासाठी कल्पेश कुमार जैन यांचे घर गाठले. पोलीस आपल्या घरात येत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यामुळे एसबीच्या अधिकाऱयांना घरात प्रवेश करता आलेला नाही. हे अधिकारी घराबाहेर ताटकळत उभे असताना जैन यांनी घरात 20 लाख रुपयांच्या नोटा जाळल्या.
अखेर अनेक प्रयत्नांनंतर पोलिसांनी घरात शिरण्यात यश मिळविले खरे, पण तोपर्यंत या नोटा जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी कल्पेश आणि परबत सिंह या दोघांना अटक केली असल्याची माहिती एसीबीचे महासंचालक बी. एल. सोनी यांनी दिली.
























































