
इंटरनेट, टीव्ही, मोबाईलच्या जमान्यात लोक वाचनापासून दूर जाऊ लागले आहेत. त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचनप्रेमी काही ना काही उपक्रम राबवत असतात. असेच एक पुस्तकवेडे दांपत्य चर्चेत आले आहे. कोलकात्यामधील या दांपत्याने चक्क फ्रीजमध्ये लायब्ररी थाटली आहे. या लायब्ररीतून वाचकांना कोणतेही शुल्क न भरता पुस्तके घरी नेता येते. अल्पावधीतच ही स्ट्रीट लायब्ररी वाचकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
कोलकाता येथील शिक्षक कालिदास हल्दर आणि त्यांची पत्नी कुमकुम हल्दर यांनी पटुली येथील सत्यजित रे पार्कजवळ अनोखी स्ट्रीट लायब्ररी सुरू केलीय. त्यासाठी त्यांनी किराणा दुकानाचा मालक तरपदा कहर यांची मदत घेतली आहे. दुकानातील फ्रीजचे रूपांतर बुकशेल्फमध्ये केले असून हा फ्रीज दुकानाबाहेर ठेवला आहे. कुणाला पुस्तक हवे असेल तर आम्हाला विचारून घरी नेऊ शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असा खास संदेश त्यांनी बुकशेल्फवर लिहिला आहे. कालिदास आणि कुमकुम यांनी शेजारील एका फलकावर काही सूचना दिल्या आहेत. या अनोख्या उपक्रमातून पुस्तकप्रेमी निर्माण करूया असं आवाहन त्यांनी केलंय. रस्त्यावरून जाणाऱया-येणाऱयांचे लक्ष लायब्ररीकडे खेचून घेण्यात हल्दर दांपत्याला यश आले आहे. हळूहळू पुस्तकप्रेमींची पावले स्ट्रीट लायब्ररीकडे वळू लागली आहेत.
सुमारे 900 पुस्तकांचा संग्रह
एका जुन्या डबल डोअर फ्रीजमध्ये सुमारे 100 पुस्तके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आणखी पुस्तके दुकानातील रॅकमध्ये ठेवण्यात आली आहेत. कालिदास हल्दर यांनी स्वतःजवळील सर्व पुस्तकांचा साठा लायब्ररीला दिला आहे. याव्यतिरिक्त 45 हजार रुपये खर्चून पुस्तकांसाठी रॅक बनवून घेतलेत आणि बऱयाच बंगाली पुस्तकांची खरेदी केलेय. सध्या त्यांच्याकडे 900 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. यामध्ये शब्दकोशांपासून कादंबरीपर्यंतच्या इंग्रजी, बंगाली पुस्तकांचा समावेश आहे. ज्यांना पुस्तक घरी न्यायचे आहे, अशा वाचकांना रॅकमध्ये ठेवलेल्या डायरीत नाव, पत्ता आणि तारीख लिहिण्यास सांगितले जाते.
कोरोनाच्या काळात मुलं दिवसभर घरात राहून मोबाईलवर जास्त वेळ घालवत आहेत. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे हल्दर यांनी सांगितले. फ्रीजमध्ये सगळी पुस्तके सुरक्षित राहतात आणि जास्त जागाही लागत नाही. आतापर्यंत अनेक जणांनी फोन करून पुस्तक दानाची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.




























































