साहित्य कट्टा – बंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळाची बखर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  प्रशांत गौतम

बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाचे जतन करण्याचे कार्य मोठय़ा प्रमाणात केले जात आहे. एक हजाराहून अधिक निरनिराळय़ा संस्थांचा यात सहभाग असतो. त्यात नवीन संस्थांचीही भर पडत असते. बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्था महाराष्ट्राचे दूतावास म्हणून मूळ संस्कृतीशी दुवा साधत असतात. त्यातीलच एक महत्त्वाचे अग्रगण्य नाव म्हणजे ‘महाराष्ट्र मंडळ बंगळुरू.’ या मंडळाच्या स्थापनेस शंभर वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून तेथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषाप्रेमी आणि अभ्यासकांनी एकत्र ‘बखर 100’ ही अत्यंत देखणी व दर्जेदार स्मरणिका नुकतीच प्रकाशित केली. यात शताब्दी वर्षानिमित्त नूतन वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांचा विस्ताराने आढावा घेतला. तेथील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा रेखा नाईक यांनी ही ‘बखर’ सप्रेमपूर्वक पाठवली. बृहन्महाराष्ट्रातील मराठी लोकांना महाराष्ट्राविषयी, मराठी भाषेविषयी आजही किती अगत्य आहे ते या निमित्ताने लक्षात आले. 1920 च्या सुमारास संस्थापक बापूराव जोशी व काही मूठभर मराठी माणसांनी निर्धाराच्या बळावर एक सामूहिक जबाबदारीची बांधिलकी स्वीकारली आणि वाढवली. त्याला आता शंभर वर्षे पूर्ण झाली. एखाद्या व्यक्तीने अथवा संस्थेने शंभर वर्षे पूर्ण करणे हा महत्त्वाचा टप्पा असतोच. बंगळुरूसारख्या परप्रांतात आपली पाळंमुळं रुजवणारी महाराष्ट्र मंडळासारखी संस्था नेहमीच तेथील मराठी लोकांना एकत्र आणत राहिली. संस्थेने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण संस्थेला काय देऊ शकतो असा जे विचार करतात, त्यांच्या हाती संस्थेची वाटचाल वर्धिष्णू होत असते. बंगळुरू महाराष्ट्र मंडळाच्या बाबतीत तेच झाले. महाराष्ट्राबाहेरच्या मराठी संस्थांचा परस्परांचा परिचय व्हावा, एकमेकांच्या कामावरून त्याची प्रेरणा घ्यावी, त्यातून प्रगती साधावी या हेतूने बृहन्महाराष्ट्र मंडळे कार्य करीत असतात. यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाची अधिवेशने भरवली जातात. बंगळुरू येथे 1945 मध्ये असे एक अधिवेशन झाले होते. मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1993 च्या सुमारास एक अधिवेशन फार दर्जेदार झाले होते.

मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बखरॅ100’ची टॅगलाइन- ‘शतवर्षाचे अतूट नाते, माऊली मराठीशी’ अशी ठेवण्यात आली. यातच स्मरणिकेची व मंडळाची भूमिका स्पष्ट होते. शंभर वर्षांच्या प्रवासातील ठळक घटनांचा आढावा, महत्त्वाच्या कागदपत्रांची छायांकित प्रत आणि भरपूर छायाचित्रे यात आहेत. संपादकीय, अध्यक्षीय मनोगत, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने. यात रेखा नाईक आणि शताब्दी समितीचे अध्यक्ष अभय दीक्षित यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. ज्येष्ठ कथा लेखिका सानिया यांनी आपली ओळख या लेखात बंगळुरू महाराष्ट्र मंडळ आणि तेथील मराठी जनतेशी असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनुराधा चौगुले यांनी ‘दस्तऐवज’ या भागात मंडळाच्या स्थापनेपासून ते गतवर्षीच्या ऑक्टोबर 2019 पर्यंत शंभर वर्षांतील ठळक घटनांचा संक्षेपाने आढावा घेतला आहे. दैनंदिनी वाचत असतानाच काही मान्यवरांच्या आठवणी यांनाही उजाळा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बखरमधील – शताब्दीपूर्व वर्ष विशेष कार्यक्रम, कवडसे, मागे वळून पाहताना, मंडळाची पुस्तक पंढरी, बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन आढावा, नमन नटवरा, रंग दक्षिणी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, फलश्रुती- संस्थापक दिन, अभिमान व योगदान पुरस्कार, मदतीचे हात, देश-विदेशातील बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली, जपान, फ्रान्स, अमेरिका येथील मराठी मंडळे या विविध शीर्षकांतर्गत अनेक लेख बखरमध्ये वाचनीय असेच आहेत. या मंडळासाठी राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचा, मदतीचाही उल्लेख विविध लेखात आलेला आहे. महाराष्ट्र मंडळासह बंगळुरू येथील काही मराठी संस्थांच्या कार्याचीही नोंद यानिमित्ताने घेण्यात आली आहे. हे महाराष्ट्र मंडळ सोशल मीडियावरही अपडेट असून ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंकही प्रकाशित होत असतो. ज्योती साठे, अनुराधा चौगुले, विद्या पळसुले यांनी संपादन केले असून उदय पळणीटकर, राजू देशमुख यांचे मुखपृष्ठ आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी 2021 रोजी ही स्मरणिका प्रकाशित झाली.

‘बखर 100’

प्रकाशक : महाराष्ट्र मंडळ, बंगळुरू

पृष्ठे : 200.