निर्बंधांबाबत नव्याने निर्णय घ्या, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पत्राद्वारे केली आहे.

या लॉकडाऊनचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्याची झळ बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, दुकानदार, हॉटेल्स, केशकर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्व छोटय़ा-छोटय़ा घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा द्यावा. गरीबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.