
‘गॅग्स ऑफ वासेपूर’मधला ‘सुल्तान’ असो किंवा ‘मिर्जापूर’मधला ‘कालीन भैया.’ आपल्या वाटय़ाला आलेल्या प्रत्येक भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी ताकदीने वठवल्या आहेत. गेल्या काही वर्षांत ते प्रसिद्धीच्या यशोशिखरावर पोहोचले असले तरी बॉलीवूडचा प्रवास आऊटसाइडरसाठी खूपच खडतर आहे. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो अशी खंत नुकतीच त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.
पंकज त्रिपाठी म्हणाले, ‘नवीन कलाकारांसाठी संघर्ष पाचवीचा पुजलेला आहे. इंडस्ट्रीत तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील किंवा गॉडफादर असेल तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही गावावरून आलेले असाल त्यात हिंदी मीडियममधून शिक्षण घेतले असेल तर तुमचा टिकाव लागणे खूप अवघड असते.’ पंकज त्रिपाठी यांचा जन्म बिहारमधील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाटणाला त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली. अभिनयाची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यानंतर दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘न्यूटन’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
तुमच्या कलेवर विश्वास ठेवा
पुढे ते म्हणाले, माझ्या 14 वर्षांच्या अनुभकातून हा विश्वास निर्माण झालाय की एखाद्या गोष्टीने काही फरक पडत नाही. महत्त्वाचं हे आहे की जर तुम्ही तुमच्या कलेशी एकनिष्ठ आहात, तुमचा कलेकर विश्वास आहे तर एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळेल. मी स्वतः याचं उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः वरील विश्वास आणि आशा कधीही गमावू नका.’























































