
निवडणूक प्रचारावर 24 तास बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करत आहेत. ममता बॅनर्जी कोलकात्यातील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करत आहेत. कूचबिहारमध्ये 4 जणांच्या मृत्यूबद्दल ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 24 तास प्रचाराला बंदी घातली आहे.
ममता यांनी ट्विट केले होते की, निवडणूक आयोगाच्या असंवैधानिक निर्णयाच्या विरोधात मी मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून गांधी मूर्ती, कोलकाता येथे धरणे आंदोलनावर बसणार आहे. भडकावू भाषण दिल्याच्या आरोपावरून सोमवारी रात्री 8 वाजताच ही बंदी लागू करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी ही कारवाई केली.
धरणे आंदोलनंतर ममता बॅनर्जी रात्री आठ नंतर दोन सभा देखील करणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कारवाईवर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींनी जोरदार निशाणा साधला. हा लोकशाहीतील काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली.




























































