खासगी क्लासमालकांचे धाबे दणाणले, नवीन प्रवेशांवर संक्रांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने कोचिंग क्लासमालकांचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्यास त्याची झळ क्लासेसच्या नव्या प्रवेशांवर बसणार आहे. क्लासेसची कार्यालये बंद राहिल्यास नवे प्रवेश कसे घ्यायचे या चिंतेत असलेल्या क्लासमालकांनी लॉकडाऊनमध्ये क्लासेसची कार्यालये सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे.

शाळा आणि महाविद्यालयांप्रमाणे कोचिंग क्लासेसना कोणतेही अनुदान मिळत नसून विद्यार्थ्यांकडून मिळणाऱया फीवर क्लासचालक, शिक्षकांसह या ठिकाणी काम करणाऱया अन्य कर्मचाऱयांचा उदरनिर्वाह होत आहे. पण वर्षभर क्लासेस बंद असल्यामुळे या सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा क्लासचालकांवर दुसऱया लॉकडाऊनची टांगती तलवार असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने लॉकडाऊनमध्ये क्लासेस सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही विद्यार्थ्यांना क्लासेसना बोलावणार नाही फक्त शिक्षकांसह इतर कर्मचारी वर्गाला क्लासेसला बोलावण्याची परवानागी हवी आहे. जेणेकरून नवीन प्रवेश प्रक्रिया राबविणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे सोपे जाईल.
– संतोष वसकर, अध्यक्ष, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन