
हिंदुस्थानी लष्कर आणि सुरक्षा बलांचे सामर्थ्य वाढवणारे स्वदेशी बनावटीचे पोलादी वाहन अशोक लेलँड कंपनीने लष्कराकडे सोपवले आहे.थेट शत्रू अथवा दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवू शकण्याची ताकद या नव्या पोलादी ट्रकमध्ये आहे. तो वजनाने हलका असल्याने शत्रूवर हल्ला करीत वेगाने घटनास्थळावरून दूर जाण्यातही सक्षम आहे. या वाहनावर ना अंदाधुंद गोळीबाराचा दुष्परिणाम होणार, ना बॉम्बचा परिणाम होणार असे सांगितले जात आहे.अशा प्रकारची वाहने कंपनीने हिंदुस्थानी हवाई दलालाही पुरवली आहेत.
हिंदुस्थानी लष्कराला मिळालेले नवे पोलादी वाहन (ट्रक) माती, दलदल अथवा पहाडी रस्तावरुन धावण्यात सक्षम आहे. शिवाय या वाहनाच्या मजबुतीमुळे आपले जवान थेट शत्रूच्या घरात घुसून शत्रूवर जोरदार प्रहार करून परतू शकणार आहेत. या वाहनात बसलेल्या जवानांना तुफानी गोळीबारासोबतच बॉम्ब हल्य्यापासूनही संरक्षण देण्याची क्षमता या वाहनात आहे. विदेशी लाइट बुलेटप्रूफ वाहन लॉकहीड मार्टिनच्या नेक्स्ट जनरेशन वाहनाचे हे अडोप्टेड रूप साकारण्यात अशोक लेलँड कंपनी यशस्वी ठरली आहे.
हलक्या वजनाचे बख्तरबंद वाहन
अशोक लेलँडचा नवा पोलादी बख्तरबंद ट्रक वजनाने हलका असल्याने कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर वेगाने धावू शकणार आहे. माती. दलदल ,रेती अथवा पहाडी विभागातील दुर्गम रस्तेही या ट्रकची दौड रोखू शकणार नाहीत. शिवाय हा ट्रक झटकन वेग पकडू शकत असल्याने तो शत्रूच्या गुहेत घुसून हल्ला करीत वेगाने परतू शकणार आहे.




























































