
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने रेल्वेने प्रथमच ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याची तयारी दर्शविल्यानंतर आज कळंबोली यार्डातून देशातील पहिल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसला विशाखापट्टणम येथे रवाना करण्यात आले. ऑक्सिजनचे सोमवारी रिकामे टँकर रो-रो सेवेद्वारे पाठविण्यात आले असून रेल्वेने यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या ऑक्सिजन एक्स्प्रेसला सोमवारी रात्री हिरवा झेंडा दाखविला.
कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी रेल्वेने आपल्या रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातून कळंबोली आणि बोयसर येथे रिकामे ट्रक चढविण्याची रेल्वेने तयारी केली आहे. मध्य रेल्वेच्या कळंबोलीच्या गुड्स यार्डमध्ये लोडींग आणि अपलोडींग करण्यासाठी 24 तासाच्या आत खास रॅम्प बांधण्यात आले. सोमवारी रात्री कळंबोलीच्या यार्डात ऑक्सिजनचे सात रिकामे टँकर रो-रो मालगाडीवर चढविण्यात आले. रात्री 8.05 वाजता विशाखापट्टणमच्या स्टील प्लांट येथून ऑक्सिजन भरून आणण्यासाठी या रो रो ट्रेनला परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. ही ट्रेन व्हाया वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जंक्शन ते विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या सायडींगला पोहचणार आहे. येथे ईकॉर झोन येथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरला जाणार आहे. त्यानंतर ही ट्रेन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागणार आहे.
























































