
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी निवडणूक आयोगापुढे हात जोडले. तुम्हाला हात जोडून विनंती करते की, राज्यातील उरलेल्या निवडणूक टप्प्यांतील मतदान एकाच दिवशी किंवा दोन दिवसांत घ्या. भाजपच्या सांगण्यावरून कुठला निर्णय घेऊ नका, अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाला कळकळीची विनंती केली.
निर्धारित निवडणुक कार्यक्रमानुसार उर्वरित टप्प्यांतील मतदान घेण्याच्या निर्णयाचा निवडणूक आयोगाने पुनर्विचार करावा, अशी विनंती ममता बॅनर्जींनी केली आहे. बंगालसह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याबाबत ममता बॅनर्जींनी चिंता व्यक्त केली.
बंगालच्या निवडणुकीचे तीन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. निवडणूक आयोगाने या तीन टप्प्यांचे मतदान एकाच दिवशी किंवा जास्तीत जास्त दोन दिवसांत घ्यावे. यामुळे कोरोनाचा संसर्ग एका पातळीपर्यंत नियंत्रणात राहील. निवडणूक कार्यक्रम आवरता घेऊन जनतेचे आरोग्य वाचवा. भले सुधारित कार्यक्रमामुळे केवळ एक दिवस वाचेल, असे ममता बॅनर्जींनी उत्तर दिनाजपूरच्या सभेत बोलताना नमूद केले.
मोदी सरकारवर निशाणा
ममता बॅनर्जींनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. देशात कोरोना रोखण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा महिन्यांत पुरेशी पावले उचलली नाहीत. भाजप हा दंगल भडकवणारा पक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच मी व माझ्या पक्षातील इतर नेते दाटीवाटीच्या वस्तीत प्रचारसभेत घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.




























































