
आळंदी येथील पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलिस स्टेशन व आळंदी पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांचे वतीने राज्यातील कोरोंनाचे संकट आणि रक्ताचा तुटवडा रोखण्यासाठीचे उपाय योजने अंतर्गत आळंदीत पंचक्रोशीतील ग्रामस्थ, युवक तरुण, सर्व पक्षीय पदाधिकारी,विविध सेवाभावी संस्था यांचे विशेष सहकार्याने महारक्तदान शिबिराचे मंगळवारी (दि.२७) करण्यात आले असल्याचे आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.
या शिबिराचे आयोजन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून यासाठीचे नियोजनासाठी आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेत युवक,तरुण कार्यकर्ते , विविध सेवाभावी संस्थांचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, नगरसेवक तुषार घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, आनंदराव मुंगसे, सुनील रानवडे तसेच आळंदी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थितीत विशेष बैठक झाली.
या बैठकीत रक्तदानाची निकड लक्षांत घेवून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी रक्तदान करण्याचे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, मुख्याधिकारी अंकुश जाधव,पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, डी. डी. भोसले पाटील, आनंदराव मुंगसे उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतींनिधी यांनी केले.
लसीकरणापूर्वी युवक तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन
यावेळी रक्तदाना विषयी रक्तपेढीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कोरोंना या महामारीचे काळात राज्यात रक्ताचा तुटवडा असून येत्या काळात 18 वर्षावरील युवकांना कोरोंना प्रतिबंधक लसीकरण होणार असल्याने लस घेतल्यावर सुमारे 60 दिवसापर्यंत रक्तदान करता येणार नसल्याने या शिबिरात लसीकरणापूर्वी जास्तीत जास्त युवक तरुणांनी तसेच अजून लस न घेतलेल्या ग्रामस्थांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीत मंगळवारी रक्तदान महाशिबीर
आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेत मंगळवार (दि.२७) महावीर जयंती व हनुमान जयंतीचे निमित्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत रक्तदान होणार आहे. यावेळी सुमारे 500 रक्तदाते रक्तदान करतील असा संकल्प आळंदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला असून शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे,यांचे हस्ते होणार आहे. यावेळी परीमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर.सहाय्यक पोलिस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे उपस्थित रहाणार असल्याचे आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.



























































