
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सध्या देशभरात चर्चेत आले आहेत. अर्थात देवभूमीला कोरोनामुक्त वगैरे केल्यामुळे ते नावारूपाला आलेले नसून, त्यांनी प्रती तास 5 लाख रुपये भाडय़ाने नवेकोरे हेलिकॉप्टर आपल्या सेवेसाठी आणल्यामुळे त्यांच्या या हेलिकॉप्टर शॉटची देशभरात चर्चा सुरू आहे. वास्तविक हिमाचल सरकारकडे एक जुने हेलिकॉप्टर आहे, त्याचे भाडेही प्रती तास 2 लाख रुपये इतके आहे. हिमाचल हे राज्य सध्या कर्जाच्या खाईत बुडालेले आहे.
त्यात कोरोनाचे आक्राळविक्राळ संकट घोंघावत आहे. मात्र ठाकूर यांना त्याची फिकीर नाही. ठाकूर त्यातही संघाचे कट्टर स्वयंसेवक. विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून पुढे राजकारणात आले. ठाकूर यांचा पक्ष रात्रंदिवस साधेपणाची जपमाळ ओढत असतो. ‘चाल, चरित्र, चेहऱया’ची ग्वाही तर बसता उठता या पक्षाकडून दिली जाते. मात्र प्रत्यक्षात भाजपच्या सत्ताधाऱयांचे वर्तन त्याच्या विपरीत असते.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावतही त्यांच्या अशाच बेताल वागण्याने घरी बसले. मात्र ठाकूर यांनी त्यापासूनही बोध घेतलेला दिसत नाही. जनतेला कोरोनाची लस व ऑक्सिजन मिळत नसताना जनभावनाही न समजण्याइतके सत्ताधारी बेदरकार झाले आहेत. उत्तराखंडमध्ये जनता भाजपला धडा शिकवेल असे वातावरण असताना ठाकूर महाशयांच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’मुळे देवभूमीत भाजपला भविष्यात सत्तेच्या मैदानाबाहेर जावे लागू शकते.





























































