सात महिन्यांच्या छकुलीने कोरोनाला हरवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीतील टेन्शन कुठच्या कुठे पळवणारी पाटण्यातील शर्मा कुटुंबाची सकारात्मक कहाणी समोर आली आहे. या कुटुंबातील अवघ्या 7 महिन्यांच्या छकुलीने कोरोनावर मात केली. तिच्यापासून सकारात्मक ऊर्जा घेत तिच्या 2 वर्षांच्या भावासह संपूर्ण कुटुंब कोरोनातून ठणठणीत बरे झाले. महामारीत चहूबाजूंनी नकारात्मक बातम्या धडकत असताना संकटात खचून जायचे नाही, असा संदेश शर्मा कुटुंबाने दिला आहे.

डॉ. अमृत राज शर्मा हे एम्स रुग्णालयाच्या ईएनटी विभागातील वरिष्ठ निवासी डॉक्टर. त्यांची पत्नी अनामिका पीएनबीमध्ये आहेत. डॉ. अमृत हे रुग्णसेवेदरम्यान कोरोना पॉझिटीव्ह झाले. पुढे पत्नी अनामिका यांना विषाणूची लागण झाली. आता मुलांचे टेन्शन होते. म्हणून पती-पत्नी कुटुंबापासून अलिप्त होत स्वतंत्र खोलीत राहू लागले. मात्र दूर राहूनही 7 महिन्यांच्या अवंतिकाला सर्दी-खोकला सुरू झाला. काही दिवसांत तिच्या 2 वर्षांच्या भावाला ताप व उलटय़ांचा त्रास झाला. चिंता वाढली होती, संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाले होते. मात्र चिमुकल्या अवंतिका व तिचा भाऊ शिवांशने कोरोनापुढे स्वतःची हिम्मत ढळू दिली नाही. त्यामुळे दोघे कोरोनातून बरे झाले.

डॉक्टर असूनही सहजासहजी मिळू शकला नव्हता बेड

डॉ. अमृत यांना ते कार्यरत असलेल्या एम्स रुग्णालयातही सहजासहजी बेड मिळू शकला नव्हता. सुरुवातीला त्यांना प्रायव्हेट रुम मिळाला नाही. त्यांना जनरल वॉर्डमध्येच आयसोलेशनसाठी ठेवले होते. संपूर्ण कुटुंब पॉझिटीव्ह होते, अशा परिस्थितीत रुग्णालयात स्वतंत्र रुम न मिळणे चिंतेचा विषय होता. यात दगदगीला तोंड देत डॉ. अमृत यांनी ईएनटीच्या एचओडी डॉ. कांती भवन यांच्या प्रयत्नाने स्वतंत्र रुम मिळवला. ते पत्नी व दोन मुलांसह सहा दिवस एम्स रुग्णालयात दाखल होते.