गोकुळ दूध संघाची निवडणूक होणारच, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळताना ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे सुरू राहील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी दिला. दरम्यान, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेताना निवडणूक केंद्राची संख्या दुप्पट करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार मतदान केंद्रांची संख्या 36 वरून 70 होणार आहे.

‘गोकुळ’ निवडणूक ही सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यासाठी कमालीची प्रतिष्ठsची ठरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निवडणुकीला स्थगिती मिळावी अशी याचिका सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीसह दोन संस्थांनी दाखल केली होती. सोमवारी (दि. 26) या याचिकेवरील सुनावणी झाली नव्हती. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष लागले होते. आज मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती उदय उमेश ललित व ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याप्रसंगी याचिकाकर्त्यांच्या वतीने कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनामुळे काही ठरावधारक बाधित झाले आहेत. यासंबंधीची माहिती देण्यात आली. तसेच, कोरोनामुळे दोन ठरावधारकांचा मृत्यू झाल्याचेही कोर्टाच्या निदर्शनास आणले.

राज्य सरकारच्या वतीनेही म्हणणे सादर करण्यात आले. राज्य सरकारतर्फे बाजू मांडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन संबंधित यंत्रणा निवडणूक घेत असल्याचे सांगण्यात आले. गोकुळच्या निवडणुकीत फक्त साडेतीन हजार मतदार आहेत. पंढरपूरची निवडणूक सुरक्षित वातावरणात पार पडली. गोकुळची निवडणूकही सर्व नियमावली पाळून होईल, असे राज्य शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि आवश्यक त्या सगळ्या नियमावलींचे पालन, सुरक्षितता यासंबंधी म्हणणे ऐकून घेत निवडणूक घ्यायला अडथळा नसल्याचे स्पष्ट केले.

‘त्यांनी’ आता जागितक न्यायालयात जाऊ नये – सतेज पाटील

n गोकुळची निवडणूक रद्द करण्यासंदर्भात हायकोर्ट झाले, सुप्रीम कोर्ट झाले. न्यायालयाने सभासदांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे सत्तारूढ गटाने आता जागतिक न्यायालयात जाऊ नये, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायायालयाचा निर्णय आला आहे. 36 ऐवजी 70 मतदान केंद्रे तयार करण्याच्या कोर्टाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित सर्व नियम पाळून पार पडेल. शेवटच्या तासाला कोरोनाबाधित असलेले ठरावधारक मतदान करतील, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

हा निकाल म्हणजे सभासदांचा विजय – हसन मुश्रीफ

n सत्तारूढ गटाचे नेते न्यायालयाचे दरवाजे निवडणूक स्थगित व्हावी यासाठी ठोठावत होते. विजयाचा आत्मविश्वास नसलेली मंडळी असे काम करतात. मात्र, परमेश्वर व नीती आमच्या पाठीशी असल्याचे सांगून, न्यायालयाचा निकाल म्हणजे सभासदांचा विजय असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.