
रेल्वेच्या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ने देशभरातील गरज असलेल्या राज्यांना ऑक्सिजन देण्याचे आपले कार्य सुरूच ठेवले असून आतापर्यंत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांना मिळून एकूण 510 मे. टन ऑक्सिजन पुरविण्यात रेल्वेला यश आले आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत असून रेल्वेने आपल्या रो रो सेवेद्वारे ऑक्सिजन टँकर लोड करून त्याचा पुरवठा सुरू केला आहे. एका टँकरमध्ये 15 ते 16 टन ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’ सामावला जात असून या टँकरद्वारे आतापर्यंत महाराष्ट्राला 174 मे. टन, उत्तर प्रदेशला 202 मे. टन, दिल्लीला 70 मे. टन आणि मध्य प्रदेशला 64 मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, हरयाणा राज्यानेही रेल्वेकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. सध्या फरिदाबाद येथे रिकामे टँकर लोड केले जात असून रौरकेला येथे ते भरण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. हरयाणासाठी प्रत्येकी पाच टँकर असलेल्या दोन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

























































