
मुंबईतील अनेक भागांवर परिणाम करणारी शिवडीतील जलवाहिनीची गळती कोणत्याही भागाचा पाणीपुरवठा बंद न करता केवळ अडीच तासांत रोखून कोरोना काळातही मुंबई महापालिका अनेक आव्हानांवर यशस्वीपणे मात करत असल्याचे सिद्ध केले आहे. पालिकेच्या जल अभियंता आणि जलकामे विभागाच्या कर्मचाऱयांनी कामगिरी केली असून भंडारवाडा, गोलंजी हिल, फॉसबेरी जलाशयांवर अवलंबून असलेल्या हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेचा जल अभियंता विभाग व जलकामे विभाग हा मुंबईकरांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी झटत असतो. शिवडी परिसरातील ‘टनेल शाफ्ट’ येथे काही दिवसांपूर्वी पाण्याची मोठी गळती होत असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गळती दुरुस्त करणे हे एक आव्हान होते, मात्र जल अभियंता व जलकामे विभागाच्या टीमने युद्धस्तरावर कार्यवाही करून अडीच तासांत ही दुरुस्ती केली. कोणत्याही भागाचा पाणीपुरवठा बंद न करता ही दुरुस्ती करण्यात आली. हे काम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त अजय राठोर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक अभियंता जीवन पाटील यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या करण्यात आले.
कोटय़वधी लिटर पाणी वाचवले
मुंबईतील विविध परिसरांना पाणीपुरवठा करणाऱया भंडारवाडा, गोलंजी हिल आणि फॉसबेरी जलाशय या तीन जलाशयांना पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीवरील ‘टनेल शाफ्ट’मध्ये ही गळती होत असल्याने कोटय़वधी लिटर पाणी वाया जाण्याची भीती होती. ज्यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र बुधवारी सकाळी 7 ते 9.30 या केवळ अडीच तासांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आल्याने भविष्यात वाया जाणारे कोटय़वधी लिटर पाणी वाचवण्यात महापालिकेच्या कर्मचाऱयांना यश आले.


























































