लसीची माहिती मुंबईकरांना देऊ; पालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेला पेंद्राकडून विशेष बाब म्हणून लसींचा साठा उपलब्ध करून दिला गेला तरच लसीकरण सुरू करता येईल. डोस मिळेपर्यंत मुंबईत रविवारपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. मात्र, या दरम्यान महानगरपालिकेला लससाठा मिळाला व लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून मुंबईकरांना देऊ, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत लसीकरणासाठी सध्या प्रत्येक केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर थेट नोंदणी करून लसीकरण करण्याची सुविधा निर्माण केल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र लसींचा तुटवडा, होणारी गर्दी आणि नियोजनबद्ध लसीकरण उपक्रम पार पाडण्यासाठी यापुढे कोविन अॅपमध्ये नोंदणी केल्यानंतरच लस दिली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

…म्हणूनच चाचण्या घटल्या

पालिकेच्या माध्यमातून शिबिरे आणि रेल्वेतून येणाऱया प्रवाशांच्या चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे दैनंदिन चाचण्यांची संख्या घटल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सद्यस्थितीत चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. पालिकेच्या माध्यमातून सध्या आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवली जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.