सोलापुरातील 339 केंद्रांवर 30 हजार जणांचे लसीकरण शक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळण्यासाठी शासनस्तरावर मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर रोज 100 याप्रमाणे 339 केंद्रांवर जवळपास तीस हजार जणांचे लसीकरण होऊ शकते. मात्र, लसींचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोविड प्रतिबंधात्मक लस एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर यांनाच लस दिली. आता मात्र 45 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जवळपास 30 लाख लोकसंख्येला लस देण्याचे उद्दिष्ट आहे, असे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.

सद्यस्थितीत जिह्यात 131 लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम सुरू आहे. यात 105 शासकीय केंद्रे, तर 26 खासगी केंद्रांचा समावेश आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार असल्यामुळे ग्रामीण, शहरी भागांत मिळून 339 केंद्रे कार्यरत करण्यात येतील. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ घेण्यात येणार आहे, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

18 ते 45 गटातील 31 लाख नागरिकांना मिळणार लस

– राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील 46 लाख 65 हजार नागरिकांपैकी पहिल्या टप्प्यात 31 लाख नागरिकांची लसीकरण मोहीम पार पडणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.