‘स्थान’ माहात्म्य – समर्थ स्थापित अकरा मारुती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

हिंदुस्थानातील अनेक प्रांतांत श्रीरामदासांनी मारुती मंदिरांची स्थापना केली हे जरी खरे असले तरीदेखील त्यातील 11 मंदिरे विशेष लोकप्रिय झाली, जी आजदेखील ‘समर्थ स्थापित अकरा मारुती’ या बिरुदावलीने प्रसिद्ध आहेत. या अकरा मंदिरांमध्ये शहापूर, मसूर, शिंगणवाडी, उंब्रज, माजगाव, बाहे-बोरगाव, मनपाडळे, पारगाव आणि शिरोळे येथे प्रत्येकी एक तर चाफळ क्षेत्री दोन मंदिरे आहेत.

समर्थ संप्रदायामध्ये अर्थात रामदासी संप्रदायामध्ये श्रीराम आणि हनुमंताची स्थापना आराध्यदैवताच्या रूपाने झाल्याचे दिसून येते. श्रीरामदासस्वामींना हनुमंताचा अवतार मानले जाते याचे कारण त्यांच्या जन्मामध्ये दडलेले आहे.

गोदामाईच्या काठी वसलेल्या ‘जांब’ गावी सूर्याजीपंत व राणूबाई या ‘ठोसर’ घराण्यातील दांपत्याला गंगाधर व नारायण असे दोन पुत्र होते. सूर्याजीपंत गावचे कुळकर्णी होते. त्यांच्या घराण्यात पिढय़ानपिढय़ा श्रीरामरायाची उपासना होती. सूर्याजीपंतांची प्रखर उपासना आणि भक्तिभाव यामुळे प्रसन्न झालेल्या सूर्यदेवाने सूर्याजीपंतांना एकेवेळी ब्राह्मणाच्या वेषात दर्शन दिले व ‘तुझ्या भक्तिभावामुळे प्रसन्न होऊन मी असा वर देतो की, ‘तुला दोन पुत्र होतील. त्यापैकी पहिला पुत्र माझ्या अंशाने जन्म घेईल. तो तुमचा वंश वृद्धिंगत करून कुळाची कीर्ती वाढवेल. तुझा दुसरा पुत्र मारुतीच्या अंशाने जन्म घेईल आणि आजन्म ब्रह्मचारी राहून जगदोद्धार करेल. तुझ्या पहिल्या पुत्राचे वास्तव्य गंगेच्या तीरावर आणि दुसऱया पुत्राचे वास्तव्य कृष्णा नदीच्या काठावर बहरेल.’ असे सांगून सूर्यदेवता अंतर्धान पावली.

सूर्याच्या वरप्रदानामुळे राणूबाईंना प्राप्त झालेला पहिला पुत्र गंगाधर (जो पुढे ‘श्रेष्ठ’ या संबोधनाने ओळखला गेला) आणि दुसरा पुत्र नारायण (जो ‘समर्थ रामदासस्वामी’ म्हणून प्रख्यात झाला) मूळ ईश्वरी अंश जागृत करून प्रसिद्ध पावला. शके 1530 च्या श्रीरामनवमीस जन्मलेला नारायण बालवयात अतिशय हूड, धीट, चुणचुणीत, चपळ, तल्लख, अभ्यासू, व्यासंगी आणि दिव्यतेजधारी होता. बालपणापासून त्याचा कल अध्यात्म मार्गाकडे आणि मन विरक्तीत रममाण झाले. दरम्यान, सूर्याजीपंतांचे निधन झाल्यामुळे ही दोन भावंडे पोरकी झाली. वडीलकीच्या नात्याने घराची जबाबदारी व वडिलांच्या आध्यात्मिक उपासनेची धुरा श्रेष्ठ गंगाधर याच्याकडे आली. याच कारणाने, एकदा नारायणाने बंधू गंगाधराकडे अनुग्रह देण्याविषयी हट्ट धरला. मात्र त्याचे बालवय जमेस धरून गंगाधर यांनी अनुग्रह देण्यास नकार दिला. हे नारायणास रुचले नाही आणि वारंवार सांगूनही श्रेष्ठांनी अनुग्रह न दिल्याचे पाहून नारायण रागाच्या भरात घरातून पळून गेला.
गावाबाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिरात नारायण पोहोचला आणि मूर्तीस्वरूप मारुतीरायाच्या पायांना मिठी घालून नारायण त्याच्यापाशी अनुग्रहासाठी विनंती करू लागला. घटिका-पळे सरली. दिवस उतरणीला लागला. संध्यासमय उलटला. रात्र झाली. पुढे मध्यरात्रही झाली तरी हट्ट न सोडता मारुतीरायाचे चरण धरून नारायण मंदिरातच बसून राहिला. पोरवयातील त्याचे धाडस आणि निष्ठा पाहून मारुतीरायाचे अंतःकरण द्रवले. त्याने स्वतः प्रकट होऊन नारायणास अनुग्रह दिला आणि ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र देऊन त्याचे समाधान केले. त्यासोबतच, मारुतीरायाने नारायणाचे नामकरण ‘रामदास’ असे करून जणू भविष्यकालीन घटनेचे सूतोवाच केले.

साक्षात हनुमंताचे दर्शन आणि अनुग्रह प्राप्त होताच नारायणाच्या वृत्तीचा पालट झाला. पुढे ‘वैराग्याचा महामेरु’ झालेल्या रामदासांनी प्रपंचाचा त्याग केला व लग्नाच्या बोहल्यावरुन धूम ठोकत ते नाशिक पंचवटीनजीक टाकळी येथे आले. रामदासांनी येथे कठोर तपश्चर्या केली. अनेक ग्रंथांचे चिंतन, मनन व पठण केले. शास्त्राभ्यास केला आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप पूर्ण केला. त्याचेच फलित म्हणून रामदासांना श्रीमारुतीरायाने मूळ महाकाय स्वरूपात दर्शन दिले. या ‘वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा’ दर्शनाने प्रभावित झालेल्या रामदासांनी त्याच वेळी ‘भीमरूपी महारुद्रा’ हे 17 श्लोकांचे काव्य रचले. येथूनच, पुढे रामदासांच्या आयुष्याने वळण घेतले.

वयाच्या पंचविशीत रामदासांनी अनेक तरुणांना भक्तिमार्गाकडे आकृष्ट केले. त्यांना बलोपासनेचे महत्त्व सांगून शरीरसंपदेचे सामर्थ्य पटवून दिले. पाहता पाहता रामदासांच्या शिकवणीने भारावलेला तरुण समाज एकत्र येत गेला. अशातच, रामदासांनी भारतभर भ्रमण केले आणि त्यांना ठायीठायी हिंदूधर्माला आलेली ग्लानी अस्वस्थ करून गेली. यवनांच्या दडपशाहीमुळे हिंदू समाज गलितगात्र होत असल्याचे पाहून ते व्यथित झाले. त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन करून तरुण पिढीचा कल शारीरिक सामर्थ्य प्राप्त करण्याकडे व्हावा असा प्रयत्न केला. प्रत्येकामध्ये तेज आणि क्षत्रियवृत्ती जागावी म्हणून त्यांनी ‘वीर’मारुतीची मंदिरे स्थापन करण्यासही प्रारंभ केला.

हिंदुस्थानातील अनेक प्रांतांत श्रीरामदासांनी मारुती मंदिरांची स्थापना केली हे जरी खरे असले तरीदेखील त्यातील 11 मंदिरे विशेष लोकप्रिय झाली, जी आजदेखील ‘समर्थ स्थापित अकरा मारुती’ या बिरुदावलीने प्रसिद्ध आहेत. या अकरा मंदिरांमध्ये शहापूर, मसूर, शिंगणवाडी, उंब्रज, माजगाव, बाहे-बोरगाव, मनपाडळे, पारगाव आणि शिरोळे येथे प्रत्येकी एक तर चाफळ क्षेत्री दोन मंदिरे आहेत.

या ‘समर्थ स्थापित अकरा मारुतींचे’ स्थानमाहात्म्यदेखील आगळेवेगळे आहे. पहिला मारुती 1645 साली स्थापन करण्यात आला. सतीबाई नावाच्या एका सत्शील स्त्राrकरिता रामदासांनी या पहिल्या मारुतीची स्थापना शहापूर येथे केली. दुसरे मारुती मंदिर ‘मसूर’ येथे स्थापन करण्यात आले. येथे रामदासस्वामींना श्रीकल्याणस्वामी या शिष्यश्रेष्ठाची प्राप्ती झाली. चाफळ येथील अंगापूर डोहातील श्रीराममूर्ती दृष्टांतरूपाने सापडल्यावर रामदासस्वामींनी येथे मूर्तीस्थापना केली आणि मंदिरासमोर ‘दासमारुती’ व मंदिराचे मागे ‘वीरमारुती’ स्थापन केला. ही मूर्ती ‘प्रतापमारुती’ नावाने प्रख्यात आहे. शिंगणवाडीचा मारुती ‘खडीचा मारुती’ किंवा ‘बालमारुती’ म्हणून ओळखला जातो.

श्रीरामदासस्वामींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात शेकडो मारुती मंदिरांची स्थापना केली तरीदेखील या अकरा मारुतींना प्रसिद्धी का लाभली याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. ही मंदिरे स्थापन करण्यामागे रामदासस्वामींना काय अभिप्रेत होते हे ठाऊक नसले तरी अन्य मारुती मंदिरांपेक्षा या 11 मंदिराचे स्थान-माहात्म्य आगळेवेगळे का आहे याचा आढावा पुढील लेखामध्ये घेऊया.

[email protected]