बी पॉझिटिव्ह बट स्टे कोविड निगेटिव्ह…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वांनी या काळात लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. कारण कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला कोविडची लागण झाली तरी कोविड आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ येणार नाही किंवा कोविडमुळे मृत्यू ओढवणार नाही याची जवळपास 100 टक्के खात्री देता येते. त्यामुळे सर्व काळजी घ्या आणि ‘बी पॉझिटिव्ह बट स्टे कोविड निगेटिव्ह’ असा मंत्र केईएमच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी दिला आहे.

कोरोना योद्धे

डॉ. प्रफुल्ल केरकर हे ‘कार्डिअॅक सोसायटी ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक समितीचे अध्यक्षही आहेत. कोविडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णावर कसे उपचार करावेत याची मार्गदर्शक तत्त्वे डॉ. केरकर यांनी तयार केली आहेत. केईएम रुग्णालयाच्या हृदयरोग विभाग कोविडचे व्यवस्थापन करीत आहे. या काळातील त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला.

कोरोना काळ व हृदयविकारावर बोलताना ते म्हणाले की, या काळात रुग्णाला अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो. हृदयविकारातही रुग्णाला त्रास होतो. त्यामुळे रुग्णालयात आलेला रुग्ण हृदयविकाराचा आहे की कोविडचा आहे हे ओळखावे लागते. पण आलेला प्रत्येक रुग्ण कोविडचा आहे असे गृहीत धरूनच पुढील उपचार सुरू होतात. आपत्कालीन हृदयरोग विभाग सदैव खुला आहे. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास त्वरित आपत्कालीन विभागात यावे, पण फॉलोअपच्या रुग्णांनी शक्यता येऊ नये. औषधांसाठी रांगा लावण्याची गरज नाही. मुळात आम्ही हृदयरोग रुग्णांना जास्तीची औषधे देत आहोत आणि शक्य असल्यास बाहेरून औषधे घ्या, असे आवाहन डॉ. केरकर यांनी केले.

रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणजे रुग्णासाठी काही संजीवनी नाही. सध्या सर्वजण या इंजेक्शनच्या मागे धावत आहे. प्लाझ्मा थेरपीने काही फायदा होत नाही असे निरीक्षण मागील कोविडच्या एक वर्षाच्या काळात नोंदवण्यात आले आहे. – डॉ. प्रफुल्ल केरकर, प्राध्यापक व विभागप्रमुख हृदयरोग विभाग केईएम रुग्णालय

नाहक चाचण्या नकोत

हल्लीच्या कोविडच्या काळात रुग्ण डी डायमर चाचणीच्या मागे लागतात. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, कोविडची सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाऱयांची डी डायमर चाचणी करावी असे उपचारांवरील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही नमूद केलेले नाही. त्यामुळे डी डायमर चाचणी विवादास्पद आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला ही चाचणी आवश्यक असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. ठरावीक लोकांना गरज लागते असे त्यांनी स्पष्ट केले.