कथा देवदूतांच्या – रुग्णांची वाहतूक करणारे सारथी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संतोष आंधळे

काविड पॉझिटिव्ह रुग्ण आहे म्हटले की आपण चार हात लांब उभे राहतो, मग तो रुग्ण घरातला असो किंवा मित्र. मात्र या अशा काळात तुमच्या एका कॉलवर महापालिकेतर्फे रुग्णाच्या घरी रुग्ण आणण्यासाठी कोविड ऍम्ब्युलन्स सध्याच्या काळात पाठविली जाते. त्या गाडीवरचा ड्रायव्हर (सारथी) मात्र रुग्णाच्या घरी जाऊन त्याला सहीसलामत घेऊन नेमून दिलेल्या कोविड केअर सेंटर किंवा संबंधित रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम गेले वर्षभर करत आहेत. विशेष म्हणजे या ड्रायव्हरनी यापूर्वी कोणत्याही ऍम्ब्युलन्सवर काम केलेले नाही. महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या एसयूव्ही पद्धतीच्या गाडय़ातून या काळात लक्षणरविरहित, सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांची ते वाहतूक करत आहेत.

लालबाग येथे राहणारे राजन खाटपे गेली 29 वर्षे या ड्रायव्हिंगची नोकरी करत असून गेल्या वर्षी जुलै 2020 पासून रुग्णांना नेण्याची नोकरी करत आहेत. ते सांगतात, ‘सुरुवातीच्या काळात रुग्णांची वाहतूक करायचो तेव्हा भीती वाटायची. ती सगळ्यांनाच वाटत होती, मात्र आता सवय झाली आहे. मी सध्या मुंबईला एकटाच राहत आहे. माझे कुटुंबीय गावाला राहतात, मात्र त्यांना कायम माझी काळजी वाटत असते. त्यांना संध्याकाळी मी व्यवस्थित आहे हे सांगण्यासाठी फोन करावा लागतो. नाहीतर घरचेच व्हिडीओ कॉल लावून बोलत असतात. त्यांना मी येथे चांगला आहे हे जाणून घ्यायचे असते. कारण आमचा रोज रुग्णांशी संबंध येतो.

या नोकरीचा अभिमान बाळगणारे सचिन सावंत याचा अनुभव जरा वेगळा आहे. ‘माझी नोकरी सध्या डी वॉर्डमध्ये सुरू आहे आणि मी राहण्यास याच परिसरात आहे. सध्या आम्ही बघतोय या कोरोनाच्या काळात अनेक लोकांना बेड्स आणि हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही. त्यासाठी लोकांची धावपळ चालू असते. नातेवाईक इकडून तिकडे रुग्णांना घेऊन फिरत असतात. या अशा बिकट परिस्थितीत आपल्याला लोकांना मदत करता येत आहे. रुग्णांना त्याच्या रुग्णालयात सोडल्यानंतर जे धन्यवाद हे शब्द ऐकायला मिळतात यापेक्षा आणखी काय पाहिजे. मी संपूर्ण देश फिरलो आहे, टुरिस्ट ड्रायव्हर म्हणून गाडी चालवली आहे. या नोकरीचा अनुभव जरा वेगळा आहे. काही वेळा नागरिक आम्हाला बंदच्या काळात नाश्ता-चहाची मदत करत असतात. आम्ही ड्रायव्हर म्हणून काम करतो. आम्ही काही मालक नाही. जो काही पगार मिळतो तो गोड मानून घ्यायचा आणि प्रामाणिकपणे काम करत असल्याचे अनुज पांडे सांगतो. तो आपल्या कुटुंबासह बीकेसी परिसरात राहतो.

वॉर रूममधून फोन येताच कोविड ऍम्ब्युलन्स धावते

कोरोनाच्या या साथीच्या आजारात रुग्ण शोधून काढणे आणि त्याला उपचार देणे ही महत्त्वाची प्रक्रिया महापालिकेतर्फे सुरुवातीच्या दिवसापासून राबवली जात आहे. ज्या घरातील रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह निघते त्यावेळी महापालिकेतील वॉर्डच्या वॉर रूममधून रुग्णांना फोन जातो आणि त्यांना नेण्यासाठी गाडी पाठवली जाते. या अशा पद्धतीने ऍम्ब्युलन्सव्यतिरिक्त मुंबईतील बहुतांश वॉर्डमध्ये या स्वतंत्ररीत्या कोविडच्या रुग्णांना आणण्यासाठी या खास गाडय़ा ठेवण्यात आल्या असून त्यांना ‘कोविड ऍम्ब्युलन्स’ हे नाव देण्यात आले आहे.

  •  विशेष म्हणजे या नोकरीत प्रत्येक ड्रायव्हरला 24 तास कामासाठी हजर राहावे लागते. कोणत्याही वेळेला फोन येऊ शकतो. फोन आला की जो पत्ता वॉर रूममधून देण्यात आला आहे त्या ठिकाणी जाऊन रुग्णांना घेऊन संबंधित रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरला नेऊन सोडायचे.