पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा निसटता विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आणि शेवटपर्यंत अत्यंत चुरशीने झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी निसटता विजय झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. या मतदारसंघात प्रथमच भाजपने विजय मिळविला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत 19 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी आवताडे विजयी झाल्याचे घोषित केले. विजयानंतर आवताडे व परिचारक समर्थकांनी जल्लोष केला.

सकाळी आठ वाजता शसकीय गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली.पहिल्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी 350 मतांची आघाडी घेतली होती. मात्र, नंतर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी काही फेऱयांमध्ये मताधिक्क्य मिळविले होते. पंढरपूर शहरातील मतमोजणीत पुन्हा आवताडेंनी आघाडी घेतली.

पंढरपूर शहर व जोडलेल्या बावीस गावांमधून समाधान आवताडे यांना एक हजाराहून अधिक मताध्क्यि मिळाले. यानंतर मंगळवेढा भागातील मतमोजणीत आवताडे व भालके यांच्यात चुरस दिसून आली. 36 व्या फेरीत आवताडे यांना 4102 मतांची आघाडी होती. यानंतर टपाली मतांची मोजणी झाली व यात समाधान आवताडे यांनी 230 चे मताधिक्क्य घेतले. शेवटच्या दोन फेऱयांत राष्ट्रवादीचे भालके यांनी जास्त मते घेतल्याने आवताडे यांचे एकूण मताधिक्क्य 3503 इतके कमी झाले होते. टपाली मतातील 230 ची आघाडी घेत आवताडे यांनी ही निवडणूक 3733 मताधिक्क्याने जिंकली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी काम पाहिले. पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम व शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला

’मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला. मी या निमित्त आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे अभिनंदन करतो आहे. आमच्या सर्व खासदार, आमदार व नेत्यांनी तिथे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष घातलं व प्रचार केला. पंढरपूरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे, हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमधील विजयासंदर्भात दिली.