जुन्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्याबदल्यात लाखो रूपये देण्याची बतावणी करणाऱ्या लष्करातील एका कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चलनातून बाद झालेल्या एक हजार रूपये मूल्याच्या 56 नोटा, मनोरंजन बँकेच्या 500 रुपयांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा, मोटार असा एकूण 27 लाख 36 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (वय 36, रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मुळ गाव ता. बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटा व नकली नोटा धायतिडक घरी बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने रेंजहिल्स येथील घरावर छापा टाकून त्याच्याकडील बाद झालेल्या व बनावट नोटा जप्त केल्या. धायतिडक हा लष्करात कामाला असून तो दीर्घ रजेवर आल्यानंतर पुन्हा ड्युटीवर हजर झाला नव्हता. त्याचा साथीदार नवाब अली चित्रपटसृष्टीत काम करत असून शुटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत होता. दोघेजण सावज हेरून त्यांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासंबंधीचे केंद्र सरकारच्या नावाने बनावट परिपत्रक दाखवत होते.

आमच्याकडे एक हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगत होता. जुन्या नोटा बदलून दिल्यास मोठा नफा देण्याच्या आमिषाने दाखवून ते नागरिकांना जाळ्यात ओढून लाखो रूपये उकळत होते. त्यांनी पुण्यातील एका व्यक्तीची अशाच प्रकारे 4 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. साताऱ्यातही एका व्यक्तीला त्यांनी फसविले आहे. धायतिडक याला न्यायालयाने 4 मेपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.