मालमत्ता कर थकबाकीदारांची लिलाव कारवाई पुढे ढकलली;वाढत्या कोरोनामुळे निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे पालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवरील लिलाव कारवाई तूर्तास पुढे ढकलली आहे. असे असले तरी थकबाकीदारांनी  आपला थकीत मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे. सद्यस्थितीत पालिकेची बहुतांशी यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा धडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिकेने मालमत्ता कर थकविणाऱया थकबाकीदारांवर आक्रमक कारवाई करीत 11 हजार 661 मालमत्ता जप्त केल्या होत्या. या मालमत्तांचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्यात येणार होती, मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तुर्तास लिलाव प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पालिकेच्या सुमारे 19 हजार कोटींच्या मालमत्ता कर थकबाकीमुळे पालिकेला आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे पालिकेने धडक कारवाई करताना 1 एप्रिलपर्यंत 5 हजार 135.43 कोटींची वसुली केली. उद्दिष्टापैकी तब्बल 98 टक्के वसुली 1 एप्रिलपर्यंत करण्यात आली. यामध्ये बडय़ा आणि वर्षानुवर्षे  थकबाकीदार असलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आला होत्या. पहिल्यांदाच पालिकेने 11 हजार 661 मालमत्ता जप्त केल्या होत्या. या मालमत्तांचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्यात येणार होती. मालमत्ता कर वसुली कायद्यात सुधारणा करून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, तूर्तास लिलाव थांबवण्यात आले असले तरी कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा थकीत मालमत्ता कराची वसुली आणि लिलाव अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त संगीता  हसनाळे यांनी दिली.

वसुली वाढली

आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या 22 दिवसांत 96 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात 1 कोटी 60 लाख कर जमा झाला होता. गेल्या वर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रभाव आहे. मात्र पालिकेच्या माध्यमातून करदात्यांमध्ये करण्यात आलेली जनजागृती आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांमुळे कराची वसुली वाढली आहे. मार्चअखेर मालमत्ता कर न भरणाऱयांकडून आता मासिक दोन टक्के दंडासह मालमत्ता कर वसूल करण्यास सुरुवात झाली आहे.