
शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदारची तडीपार सराईताने चाकू हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण थिएटरजवळ घडली. घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तडीपार सराईताला अटक केली आहे. त्याशिवाय बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवरही चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे पुणे शहर हादरले आहे.
समीर जमील सय्यद ( वय 48, रा.खडक पोलीस लाईन, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी सराईत प्रविण श्रीनिवास महाजन(वय 36, रा.कसबा पेठ) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी महाजनला कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाजन सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तीन ते चार शरीराविरुध्दचे गुन्हे आहेत. त्याला एक वर्षापूर्वी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा भंग करुन तो शहरात आला होता.
पोलीस हवालदार समीर सय्यद हे फरारसखाना पोलीस ठाण्यात डयुटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ते ड्युटी संपल्यावर घरी गेले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास ते श्रीकृष्ण थिएटरजवळील एका हॉटेलनजीक काहीजणांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आलेल्या तडीपार प्रविण महाजन याच्यासोबत सय्यद यांची बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात महाजनने सय्यद यांच्या गळ्यावर पोटावर व छातीवर वार करुन त्यांचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचून सय्यद यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषीत करण्यात आले. पोलीस हवालदाराचा खून झाल्याचे कळताच घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, अजितकुमार पाटील व तेजस्वी पाटील यांनी धाव घेतली होती. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.
”पोलीस हवालदाराच्या खूनप्रकरणी सराईत आरोपीला फरासखाना पोलिसांनी तासाभरामध्ये अटक केली आहे. वादातून त्याने हवालदाराचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्याशिवाय महिलेच्या खूनप्रकरणातही आरोपीचा शोध घेतला जात आहे.” – राजेद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून
पुणे- पोलीस हवालदाराचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवार पेठेतील एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा चाकुने भोसकून खून करण्यात आला. राणी (वय 25 , सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्याचे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बखर नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भोसरीतील एका हॉटेलमध्ये बखर वेटर आहे. राणी आणि त्याची ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. वादातून त्याने मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राणीवर चाकुने वार करून खून केला. भर रस्त्यात राणीच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून तिचा खून करण्यात आल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

























































