
15 दिवस कोरोना विलगीकरण केंद्रावर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये अंधेरीच्या दाऊद बाग महापालिका शाळेतील 48 वर्षीय शिक्षक इस्माईल इब्राहिम शेख अपवाद ठरले आहेत. शेख सर 5 मे 2020 पासून अंधेरी पश्चिम येथील पीडब्लूडी कोरोना विलगीकरण केंद्रात केंद्र संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहे. आज त्यांच्या सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शेख सरांना गौरविण्यात आले.
केंद्रातील संक्रमित रुग्णांची नोंद ठेवणे, त्यांच्या आणि डॉक्टर, नर्सच्या जेवणाची व्यवस्था करणे, पीपीई किट, सॅनिटायझर्स, मास्कचा पुरवठा करणे यापासून ते प्रत्येक रुग्णाला आंघोळीच्या साबणापासून टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, कपडय़ांच्या साबण व इतर वस्तू पुरवणे व त्यांचे नियोजन आखण्याचे काम शेख यांना करावे लागते. आज त्यांच्या या कामाला एक वर्ष पूर्ण झाले. विलगीकरण कक्षात काम करूनही त्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. या केंद्रावर रविवार वगळता दररोज ते सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत काम करतात. यादरम्यान त्यांनी एकदाही सुट्टी घेतलेली नाही. कोरोना डय़ुटीसोबतच त्यांचे विद्यार्थ्यांवरही लक्ष आहे.
सुरुवातील विलगीकरण कक्षात काम करताना टेन्शन येत होते. पण नियमित मास्क, सॅनिटायझर्सचा वापर केला तर संक्रमणाचा धोका नसतो हे लक्षात आले. राज्य सरकारच्या कोरोना लढय़ात माझाही सहभाग असावा या हेतूने मी हे काम करीत आहे. कोरोना लढय़ात माझेही योगदान असल्याचा मला आनंद आहे.
-ईस्माईल शेख, शिक्षक,दाऊद बाग महापालिका शाळा, अंधेरी

























































