
शिवसेनाप्रमुखांनी आम्हा शिवसैनिकांना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याची शिकवण दिली आहे. त्या शिकवणीतून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोरोनाच्या संकटात काम करत आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रत्येकाने एक दिलाने काम करणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून रूग्णसेवेची गरज असून पुंडलिक खांडे यांनी ग्रामीण भागात 500 बेडचे कोविड सेंटर उभे करून आदर्शवत काम करून दाखवल्याचे गौरवोद्गार शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
शिवसेना जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडे यांनी बीडपासून जवळच असलेल्या अंथरवणपिंप्री येथे उभारलेल्या 500 बेडच्या स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी झाले. यावेळी बोलताना ना.शिंदे म्हणाले की, राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट आलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रचंड गांभीर्याने आजची परिस्थिती हाताळली आहे. कोविड लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता काही जिल्ह्यात रुग्णांचा आकडा कमी होत आहे.
बीड जिल्ह्यातही शासन-प्रशासन चांगले काम करत आहे. शिवसेनाप्रमुखांनी आम्हा शिवसैनिकांना संकटाच्यावेळी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची शिकवण दिली. त्या शिकवणीतून शिवसैनिक ठिकठिकाणी कोरोनाकाळात काम करत आहे. इथेही पुंडलिक खांडे यांनी कोविड सेंटर उभारून शिवसेनाप्रमुखांचा सच्चा शिवसैनिक असल्याचे दाखवून दिले आहे. बीड जिल्ह्यात ऑक्सिजन अथवा अन्य कुठल्याही गोष्टींची कमतरता कमी पडू देणार नाही असे आश्वासन नामदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे पाटील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख वुंâडलिक खांडे, सुरेश नवले, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब आंबुरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वांनी या कोविंड सेंटरची पाहणी केली. त्या ठिकाणी रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली.



























































