
लसीकरणाच्या गोंधळात कोविन अॅपने भर घातली असून परराज्यातील लोकही कोविन अॅपद्वारे नोंदणी करून राज्यात लसीकरणासाठी येत आहेत, असा गौप्यस्फोट करतानाच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लसीचा तुटवडा, केंद्राचा नियोजनशून्य कारभार, राज्य सरकारांना असहकार्य करण्याच्या भूमिकेमुळे देशभरात लसीकरण मोहिमेचा पुरता बोजवारा उडाल्याची जोरदार टीका केंद्र सरकारवर केली.
लसीसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या कोविन अॅपवर नोंदणी करावी लागते; परंतु या अॅपमुळे मोठा गोंधळ होत आहे. कोणीही, कोणत्याही केंद्रावर नाव नोंदवून लस घेऊ शकतो. नगर जिह्यातील घुलेवाडी केंद्राला 400 डोस प्राप्त झाले होते. या केंद्रावर लस घेण्यासाठी बाहेरच्या जिह्यातून 180 लोक आले. यात नाशिक, पुणे, परभणी जिह्यातील लोक होते. हाच प्रकार राज्यांबाबतही होत असून हैदराबादमधूनही काही लोक लसीकरणासाठी नगरमध्ये आले होते, अशी माहिती थोरात यांनी दिली. लसीसाठी लोक जिवाचे रान करत आहेत. असे प्रकार इतर केंद्रांवरही होत असतील. महाराष्ट्र सरकारने लसीकरणासाठी राज्य सरकारच्या स्वतंत्र अॅपला परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा विनंती करूनही केंद्र सरकारकडून यावर अद्याप सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असेही थोरात म्हणाले.
केंद्र सरकार अपयशी
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलेच आहे. आता केंद्र सरकारच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे देशातील लसीकरण मोहिमेचाही बोजवारा उडाला आहे. 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली, पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात लस दिली नाही. कोरोना प्रतिबंधक लसींचा सर्वात मोठा उत्पादक असणाऱया भारतामध्ये लसपुरवठय़ाअभावी लसीकरण केंद्रे बंद आहेत याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
































































