
23 मे रोजी होणारी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सोमवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द करण्याची मागणी पुढे येत होती. 23 मे रोजी होणाऱ्या या परीक्षेला राज्यभरातून सुमारे 6 लाख विद्यार्थी बसणार होते. या परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्यभर विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रम होता. ही परीक्षा तूर्तास रद्द करून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा आयोजनाबाबत विचार करावा, अशी मागणी शिक्षक संघटनाकडून करण्यात आली होती. या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याबाबत परिषदेने परिपत्रक जारी करत, आता परीक्षा कधी होतील हे नंतर कळवण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.


























































