मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना सरकारी योजनांमधून मोफत उपचार द्या! खासदार शेवाळे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत महाराष्ट्रात आढळणाऱया सर्व मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि  ‘आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना’ या योजनांच्या माध्यमातून मोफत कोरोना उपचार द्यावा, अशी  मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणाऱया आर्थिक ताणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांवर आधीच मोठय़ा प्रमाणात ताण असल्याने मध्यमवर्गीय रुग्णांना परिसरातील नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागते. एका कोरोना रुग्णाचे दहा दिवसांचे कमीत कमी बिल साधारण दीड ते दोन लाख रुपये होते. त्यातच घरातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित झाल्यास हा आकडा कमीत कमी दहा लाखांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडतो. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या रुग्णांचा ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ किंवा ‘आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना’ या योजनांमध्ये समावेश करून त्यांना मोफत कोरोना उपचार दिल्यास राज्यातील मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल, असे खासदार शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे.