दहशत पसरविणाऱ्या सराईताविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरूद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपडीए अ‍ॅक्टनुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. शाहरूख उर्फ चांग्या मेहबूब खान (वय 26 रा. कोंढवा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार संघटीत गुन्हेगारी करणाNया टोळ्यांसह सराईतांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः टोळ्यांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करून त्यांनी नागरिकांची वाहवा मिळविली आहे. दरम्यान, मार्केटयार्ड परिसरातील सराईत शाहरूख उर्फ चांग्याविरूद्ध जीवघेणी हत्यार बाळगणे, जबरी चोरी, दुखापत करणे, घरफोडी, बेकायदा हत्यार बाळगणे, असे 8 गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्याविरूद्ध तक्रार करण्यासाठी नागरिक कोणीही धजावत नव्हते. त्यानुसार मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे आणि पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी सराईत शाहरूखविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. संबंधत प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत शाहरूखला एक वर्ष स्थानबद्ध केले आहे. त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आतापर्यंत 20 गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.