
>> संतोष आंधळे
सध्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गावाकडे कोरोनाबाधितांची संख्या करण्यासाठी स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या अशाच परिस्थितीत कोरोनाबाधितांच्या संख्येला वेळेतच आळा घालून संपूर्ण गाव कोरोनामुक्त करणाऱया नगर येथील हिवरे बाजार गाव संपूर्ण राज्याला आदर्श असे गाव ठरले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन येथील माजी सरपंच पोपटराव पवार यांना नगर येथील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नगर येथील 1300 गावांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतेच आमंत्रित केले होते. हिवरे बाजार गावचा कोरोनामुक्ती पॅटर्न सगळ्यांना कळण्यासाठी पवार यांनी गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत 1300 सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
याबाबत अधिक माहिती देताना पोपटराव पवार यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले की, ‘मार्च महिन्यात या गावात पहिला रुग्ण कोरोनाबाधित सापडला. त्यानंतर गावातील काही शिक्षक, तरुण आणि नोकरदार वर्ग यांच्या सहकार्याने चार टीम तयार करून सर्वेक्षण करून बघितले. त्यात लक्षणांच्या आधारावर माहिती घेतली. 32 जण त्या लक्षणांनुसार बाजूला काढले. आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला वेळ लागतो. त्यामुळे जिल्हा उपकेंद्रात अॅण्टीजेन टेस्ट करून घेतल्या त्याचे अहवाल येण्याआधी त्या सर्वांना गावातील प्रशिक्षण केंद्रात त्याची रवानगी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले. त्यांना त्याच ठिकाणी सर्व उपचार आणि मदत देण्यात आली. अशा पद्धतीने लक्षणे दिसताच विलगीकरण कक्षात उपचार दिल्याने आम्हाला रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळाले आणि रुग्ण बरे होण्यातही मदत झाली. रुग्णांना लक्षणे दिसताच उपचार आमच्याकडे केले गेले. त्यामुळे गावात आताच्या घडीला फक्त केवळ एक रुग्ण आहे.’
आदर्श गावाचा नावलौकिक अख्ख्या राज्यात मिरविणाऱया हिवरे बाजार गावात मार्च ते मे महिन्यापर्यंत 52 रुग्ण होते. त्यापैकी दुर्दैवाने एक रुग्ण दगावला तर चार रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागली होती. पण सगळे आता व्यवस्थित आहे. गावात 200 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले असून उर्वरित नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्याशिवाय गावात जे नागरिक नोकरीकरिता बाहेर जातात, दूधसंकलनासाठी गावात ये-जा करतात किंवा बाहेरून जे मजूर शेतीच्या कामासाठी येतात त्यांच्यासाठी नियमावली बनवली आहे त्याचे पालन प्रत्येक जण करीत आहे.
कुटुंबीयांशी संवाद साधून समुपदेशन
दोन दिवसांपूर्वी आमच्या गावात नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आले होते. त्यांनी गावाची पाहणी केली आणि त्यांनी कशा पद्धतीने हा हिवरे बाजार गावाचा कोरोनामुक्ती पॅटर्न पूर्ण नगर जिह्यातील गावात राबविता येईल चर्चा केली. त्यानंतर मला नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून गुरुवार आणि शुक्रवारी 1300 सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्याचे सांगण्यात आले. त्या सगळ्यांना आम्ही आमच्या गावात कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येतील याची त्यांना माहिती दिली. विशेष म्हणजे मी आजही आमच्या गावातील जे रुग्ण आजारी पडतात त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना समुपदेशन करत असतो. कोरोनावर मात करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असते.






























































