
लॉकडाऊनमध्ये तळीरामांचा गळा ओला करण्यासाठी धारावीमध्ये एक तरुण दारूचा झोल करत होता. विविध विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये हलक्या दर्जाची दारू भरून ती दारू तो पाहिजे त्यांना विकत होता.अशाप्रकारे तळीरामांना फसवून आपला खिसा भरणाऱया त्या तरुणाला धारावी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
धारावीतील ढोरवाडा परिसरात असलेल्या भारतीय चाळीत एक इसम नामांकित कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये हलक्या दर्जाची दारू भरून त्या दारू विकण्यासाठी दिल्या जात असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक वाणी यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाणी यांनी त्यांच्या पथकासह शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भारतीय चाळीतील दुसऱया मजल्यावर असलेल्या त्या खोलीत छापा टाकला. त्यावेळी तेथे रवी परमार (32) नावाचा तरुण विदेशी मद्याच्या बाटलीमध्ये हलक्या दर्जाची दारू मिक्स करताना आढळून आला. तसेच घटनास्थळी पोलिसांना विदेशी मद्याच्या भरलेल्या 60 बाटल्या, 45 रिकाम्या बाटल्या, बुचे, झाकणे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी रवी परमार यास अटक केली. अशाप्रकारे भेसळ केलेली दारू तो कोणाला विकत होता याचा पोलीस शोध घेत आहेत.
































































