भाजप नेत्यांनी व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत, काँग्रेसचा केंद्रावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएम केअर फंडातून संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या मुद्यावरून आज काँग्रेसने भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. जनतेच्या जिवापेक्षा मोदींची प्रतिमा महत्त्वाची वाटणाऱया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावेत, असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले.

कोरोना काळात तकलादू व्हेंटिलेटर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरविणाऱया आणि गुजरातमधील भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला.

पीएम केअरमधून दिलेले व्हेटिंलेटर्स तकलादूच असून त्यासंदर्भात सुरू असलेली सारवासारवही उघड झाली आहे. संभाजीनगर शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या 17 मेच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकार तसेच गुजरात भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या अहवालानंतर केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाल्याची टीका त्यांनी केली.

संभाजीनगर मेडिकल कॉलेजने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णत: तकलादू असल्याचे नमूद केले आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने काँग्रेसने पीएम केअर्स फंडातून महाराष्ट्राला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. यावर राष्ट्रीय स्तरावर वादळ उठल्यानंतर 14 मे रोजी केंद्र सरकारने त्यावर उत्तर देऊन ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा आणि सगळा दोष संभाजीनगर शासकीय वैद्यकीय रुग्णालयावर टाकण्याचा प्रयत्न केला; पण संभाजीनगर मेडिकल कॉलेजच्या अहवालामुळे केंद्र सरकारला प्रत्युत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.