
शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमीष दाखवून केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱयांचा केसाने गळा कापला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर खतांच्या भावात 55 टक्के भाववाढ करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱयांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकायचे आणि दुसऱया हाताने काढून घ्यायचे अशा दुतोंडी भूमिकेमुळे मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खताची अन्यायकारक दरवाढ मागे घेण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे.
शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केला संताप; शरद पवार यांचे केंद्राला खरमरीत पत्र
राज्यातल्या खतांच्या वाढत्या किमतीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय खते आणि रसायनमंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान शेतकऱयांना सामोरे जावे लागणाऱया समस्यांचाही उल्लेख केला आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाने शेतकरी आधीच होरपळून निघालेला असताना खतांचे दर वाढवणं म्हणजे शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे, असे शरद पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोरोनामुळे देशातील अनेक भागांत सातत्याने लॉकडाऊन लावावे लागत आहे. त्यातून बाजार व्यवस्था कोलमडल्याने त्याचा मोठा फटका शेतमालाला आणि परिणामी शतेकऱयाला बसला आहे. आता पावसाळा जवळ आला आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. अशावेळी खतांच्या वाढीव किमतीमुळे शेतीवरील खर्चात आणखी वाढ होणार आहे. आधीच इंधनाचे दर वाढल्याने आर्थिक भार पडला असताना आता खत दरवाढ करून शेतकऱयाच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम पेंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे या प्रश्नी आपण व्यक्तिशः लक्ष घालून खतांच्या वाढीव किमती पूर्ववत केल्यास मला आनंद होईल, अशी विनंती शरद पवार यांनी सदानंद गौडा यांना केली आहे. कोरोनाच्या या संकटकाळात शेतकऱयांना जास्तीत जास्त मदत होईल, असे निर्णय अपेक्षित असल्याचेही पवार यांनी पुढे नमूद केले.
खताच्या खरेदीसाठी शेतकऱयांना अनुदान द्या -चंद्रकांत पाटील
गेले वर्षभर कोरोना महासाथ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱयांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱयांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता पेंद्र सरकारने शेतकऱयांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
खतांचे वाढीव दर अन्यायकारक खासदार हेमंत पाटील संतप्त
एकीकडे शेतकऱयाला दोन हजार रुपये देण्याची घोषणा करायची आणि दरवाढ करून शेतकऱयांच्या खिशातून काढून घ्यायची, अशा पद्धतीचे अतिशय अन्यायकारक आणि दुटप्पी धोरण केंद्र शासनाने राबवले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांना पत्र लिहिले असून हजारो शेतकऱयांचे निवेदनही पंतप्रधानांना पाठविण्यात येणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. कोरोना काळात शेतकऱयांचा आक्रोश पाहून ही दर वाढ रोखायला हवी, अशी मागणी केली.































































