
‘तौकते’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे बार्जवरून समुद्रात पडलेल्या ओएनजीसी कर्मचाऱयांनी जीवन-मृत्यूचा थरार अनुभवला. डोक्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस, भीतीदायक काळेकुट्ट आभाळ आणि खवळलेल्या समुद्रात प्रचंड लाटांबरोबर हेलकावे खात तब्बल 11 तास फक्त लाईफ जॅकेटच्या सहाय्याने त्यांनी झुंज दिली. नौदलाने मात्र अशा खवळलेल्या समुद्रातही धाडसी ऑपरेशन करून कर्मचाऱयांना वाचवले. त्यामुळेच नौदलाचे जवान आमच्यासाठी देवदूत ठरले, अशी कृतज्ञता कर्मचाऱयांनी व्यक्त केली. बार्जमधील 266 जणांपैकी वाचवण्यात आलेले 184 कर्मचारी आज मुंबईत परतले. दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला तर 60 जणांचा शोध अद्याप सुरू आहे.
‘तौकते’ चक्रीवादळाचा फटका हिरा फिल्डजवळ काम करणाऱया ‘पी-305’ या ओएनजीसी बार्जला बसला. काय घडत आहे याची कल्पना येण्याआधीच 266 कर्मचारी समुद्रात कोसळले. मुंबईतील यंत्रणेशी संपर्क तुटला आणि सुरू झाली जीव वाचवण्याची धडपड. मात्र पाऊस, भरून आलेले काळे आभाळ आणि खवळलेल्या समुद्रात प्रचंड लाटांसमोर हेलकावे खात हे कर्मचारी बचावासाठी आक्रोश करत राहिले.
आता ‘यास’चा धोका
हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘तौकते’ने कहर केल्यावर आता ‘यास’ हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 21 मेपासून उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून 22 आणि 23 मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्येदेखील होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नौदलाची अचाट कामगिरी
ओएनजीसी कर्मचाऱयांच्या दुर्घटनेची माहिती मिळताच नौदलाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावत बचावकार्य सुरू केले. ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘कोची’ या युद्धनौकांबरोबरच ‘आयएनएस तेज’, ‘बेतवा’ आणि ‘बीस’ यांच्यासह मुंबईपासून 175 सागरी मैलावर असणाऱया हिरा फिल्डजवळ कूच केले. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातही हिंदुस्थानी नौदलाने धाडसी ऑपरेशन हाती घेत तब्बल 184 जणांचे प्राण वाचवले. यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 जणांचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे.
पाच दिवस आधीच दिली होती सूचना – तटरक्षक दल
‘तौकते’ चक्रीवादळाची पूर्वसूचना तटरक्षक दलाने आधीच ओएनजीसीली दिली होती. तटरक्षक दलाने ओएनजीसी आणि ऑफशोअर अॅडव्हायझरी ग्रुप यांना जहाजे बंदरावर परत बोलावण्याची सूचना पाच दिवस आधीच दिली होती. तरीही ओएनजीसीने दिलेल्या माहितीचे पालन का केले नाही, असे तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर जनरल इन्स्पेक्टर आनंद बडोला यांनी स्पष्ट केले आहे.



























































