
चिपको आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ पर्यावरणवादी, पद्मविभूषण, पद्मश्री सुंदरलाल बहुगुणा यांचे आज कोरोनाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. हृषिकेशच्या पूर्णानंद बेटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना हृषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मुख्यमंत्र्यांची आदरांजली
आज देशाने एक निसर्गऋषी गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली आहे. पर्यावरण रक्षणासाठी जीवन वेचणारे बहुगुणा हे जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी केवळ झाडे वाचवली नाहीत तर घराघरात पर्यावरण चळवळ नेली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

























































