दिलासादायक…शहरी भागात 62 टक्के, गावांत 46 टक्के रुग्ण घटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील बहुतांश शहरांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन आठवडय़ांपासून कमालीची घट झाली आहे. शहरी भागात 62 टक्के तर गावांत 46 टक्के नव्या रुग्णांचे प्रमाण घटले असून ही आकडेवारी दिलासादायक आहे.

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या काही शहरांत लाखाच्या आसपास रुग्ण सापडायचे त्या 15 शहरांतील रुग्णसंख्या 40 हजारांपर्यंत खाली आली आहे. असाच ट्रेंड सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेल्या जिह्यांत आहे. गेल्या काही दिवसांत 15 हजार रुग्णसंख्या आढळणाऱया जिह्यांतील रुग्णांची सरासरी 800 इतकी खाली आली आहे.

गेल्या सात दिवसांमध्ये नवीन रुग्णांमध्ये 3.82 टक्के इतकी घट झाली आहे, तर मृतांचा आकडा 1.07 टक्यांवर गेला आहे. 7 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर 22 राज्यांमध्ये हा आकडा 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 21 राज्यांत दररोज बरे होणाऱया रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागाचे जॉइंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली.

रिकव्हरी रेट वाढला

देशभरात 3 मे रोजी सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण 17.13 टक्के होते ते आता 12.1 टक्के इतके खाली आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 81.7 टक्क्यांवरून 86.7 टक्के झाला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये सक्रिय प्रकरणे आणि रुग्ण बरे होण्याच्या प्रकरणांची तुलना केल्यास ऑक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हरी रेट वाढल्याचे दिसून येत आहे.

तरुणांमध्ये उत्साह

देशात कोरोनाविरोधातील लढाईसाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत तरुण वर्गदेखील मोठय़ा प्रमाणात सामील झाला आहे ही महत्त्वाची बाब. तर जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सोशल मीडियावरदेखील जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळेच की काय जबलपूर येथील लसीकरण केंद्रावर लस टोचून घेताना तरुणीला सेल्फीचा मोह आवरला नाही.