
‘जे गाव करील, ते राव काय करील’ ही परंपरागत महान सार्थ ठरवत ओडिशातील गंजम जिल्ह्यातील करंजारा गावच्या ग्रामस्थांनी काटेकोर प्रतिबंध पाळत जीवघेण्या कोरोनाला वेशीबाहेरच रोखून ठेवले आहे. 1234 लोकवस्ती असलेल्या या गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. शहरी भागात वेगाने पसरणाऱया कोरोना विषाणूने आता ग्रामीण भागातही पाय रोवले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढते रुग्ण पाहता पेंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नियमावलीही जारी केली आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. या स्थितीत ओडिशातील गंजम जिल्ह्यातील एका गावाने संपूर्ण देशासमोर आदर्श ठेवला आहे.
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील करंजारा गावातील नागरिक कोरोनाला रोखण्याचे सर्व नियम सुरुवातीपासूनच काटेकोरपणे पाळत आले आहेत. त्यामुळे जगात कोरोनाची लाट आल्यापासून आतापर्यंत एकही रुग्ण या गावात आढळलेला नाही. या गावाची लोकसंख्या 1 हजार 234 इतकी आहे. जानेवारी महिन्यात प्रशासनाने या गावातील 32 नागरिकांची कोरोना चाचणी केली होती. त्यात कुणालाच कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले होते.
कडक शिस्तीने ग्रामस्थांनी संकट रोखले
‘करंजारा गावातील ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती आहे. गावातील प्रत्येकजण न चुकता मास्क घालतो. सोशल डिस्टन्सिंगची नियमावलीही पाळली जात आहे. त्यांनी अत्यावश्यक वस्तूंचा घरी साठा केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरजेशिवाय ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत,’ असे गंजमच्या जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. राज्य सरकारने नव्या नियमावलीनुसार आशा आणि अंगणवाडी सेविकांना दारोदारी जाऊन कोरोना स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. करंजारा ग्रामस्थ जागरूक असून कटाक्षाने कोरोना प्रतिबंधक नियमावली पाळत आहेत. गावातील काही जण मुंबईत कामाला आहेत. त्यापैकी जे कुणी गावी परतले त्यांनी 14 दिवस स्वतःला संस्थात्मक क्वारंटाइन केले होते . तसेच कार्यक्रम, समारंभ टाळले. ग्रामस्थांच्या या कडक शिस्तीमुळेच त्यांनी कोरोनाच्या संकटाला वेशीबाहेरच रोखले आहे.

























































