
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी तो 22 टक्क्यांपर्यंत आहे. हा रेट आणखी कमी होणे आवश्यक असल्याने 5 ते 26 मेपर्यंत सुरू असणाऱया कडक निर्बंधांबाबत 14-14 दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत किती फरक पडतो याची मीमांसा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, ज्या ग्रामसमित्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी चांगली केली त्या गावांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसमित्यांनी अधिक सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस यंत्रणेने निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
कोरोना सद्यःस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. यावेळी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणातूनच या रुग्णांवर उपचार व्हावेत. तसेच या रुग्णांना उपचार देणाऱया डॉक्टर्सना या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती अधिक काळजी घ्यावी, यासाठी ऑनलाइन वर्कशॉप घ्यावा, असे सूचित केले. याबरोबरच म्युकर मायकोसिसची पुढील काळात रुग्णसंख्या कितीपर्यंत वाढू शकते याचा अंदाज घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे. कोरोना रुग्णवाढ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने गावागावांमधून कम्युनिटी आयसोलेशन अत्यंत प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात रुग्णसंख्या वाढत आहे. याची यंत्रणेने अधिक गांभीर्याने कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. तिसऱया लाटेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील बालरोगतज्ञांची बैठक घ्यावी व अनुषंगिक तयारी ठेवावी. लॉकडाऊन निर्बंधांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
जास्त रुग्ण आढळणाऱया गावांमध्ये निर्बंधांची कडक अंमलबजावणी
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कडक निर्बंधांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे सुरू असून, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वात जास्त रुग्ण आढळणाऱया गावांमध्ये कडक अंमलबजावणी सुरू आहे. जत, वाळवा आणि मिरज या तीन तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून, या ठिकाणी निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी अधिक पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.
म्युकर मायकोसिसचे 72 रुग्ण
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात सध्या साडेसहा ते सात हजार टेस्टिंग होत आहे. तेराशे ते साडेतेराशेपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर झालेली दिसून येत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णही आपल्या जिल्ह्यात उपचारासाठी येत असून, यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दररोज दहा ते बारा असे आहे. जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे 72 रुग्ण असून, त्यांच्यासाठी लागणाऱया औषधांचा पुरवठा पुरेसा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.
18 वर्षांखालील मुलांचे सर्वेक्षण
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तिसऱया लाटेच्या अनुषंगाने बालरोगतज्ञांच्या माध्यमातून मॉडय़ुल तयार करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून 18 वर्षांखालील मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणारअसल्याचे सांगितले.




























































