
जीवनात आनंद मिळवण्यासाठी माणसाने एकतरी छंद जोपासायला हवा. छंदामुळे माणसाच्या जीवनाला एक ध्येय मिळतं आणि फावल्या वेळेचादेखील सदुपयोग होतो. पोलिसाची नोकरी म्हणजे ऑनडय़ुटी 24 तास. कामाच्या तणावात ना कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ असतो ना स्वतःच्या प्रकृतीकडे. तरीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कणकवलीतील सागर देवार्डेकर या पोलीस शिपायाने लाकडापासून खेळण्या आणि शोभिवंत वस्तू बनवण्याचा छंद जोपासला आहे.
सागर देवार्डेकर हे राधानगरी तालुक्यातील मूळचे बुरंबाळी येथील आहेत. 2017 रोजी ते पोलीस शिपाई या पदावर रुजू झाले. सध्या ते कणकवली पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहेत. पोलीस सेवेव्यतिरिक्त मिळणाऱया रिकाम्या वेळात ते आपला छंद जोपासत आहेत. लाकडापासून स्पोर्ट्स बाईक, ट्रक्टर, बैलगाडी, रेल्वे, विमान अशा विविध खेळण्यांसह घरातील शोभिवंत व गृहपयोगी अशा कितीतरी वस्तू बारीक कलाकुसरीने बनवून, त्यांना चकाकी देऊन आकर्षक करण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्या घरीच त्यांनी छोटेसे वर्कशॉप तयार केले आहे. यात लाकूड कटाईची लहान-मोठी अनेक हत्यारे, झिकसॉ मशीन, ड्रिल, ग्राइंडरसह लाकडी वस्तूंना चकाकी आणणारे पॉलीश आदी साहित्य जमा केले आहे.
आधुनिक काळात पारंपरिक लाकडी खेळण्यांची जागा प्लॅस्टिकच्या खेळण्यांनी घेतली आहे. लाकडी खेळण्यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी आपले मित्र व आप्तजनांच्या परिवारातील मुलांच्या वाढदिवसाला ते स्वतŠ हाताने बनवलेली खेळणी किंवा शोभिवंत वस्तू भेट म्हणून देतात.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी असून आम्ही प्रामाणिकपणे सेवा बजावत आहोत. सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांनीदेखील सेवेव्यतिरिक्त मिळणारा वेळ आपल्या कुटुंबासोबतच आपल्या आवडत्या छंदाला देणे फार महत्त्वाचे आहे. – सागर देवार्डेकर
























































