
इच्छाशक्ती आणि आध्यात्मिकतेच्या जोरावर धायरी येथील ठकूबाई बेनकर या 80 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवले. तब्बल 34 दिवस त्यांनी लढा देत कोरोनावर मात केली. आजींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांचे मोठय़ा उत्साहात आणि आनंदाने स्वागत केले.
धायरी येथील बेनकर कुटुंबातील आजींना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्वरित त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ठकूबाई यांना रक्तदाब आणि मधुमेह असल्याने याआधी त्यांच्यावर दोनदा शस्त्र्ाक्रिया करण्यात आली आहे. त्यातच त्यांचा एचआरसीटी स्कोर नऊवर आल्याने प्रकृती चिंताजनक झाली होती.
त्यामुळे त्यांना उपचारासाठी कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 18 दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. रुग्णालयात उपचार घेत असताना आजींनी सकारात्मक विचार करत आध्यात्मिकतेचा जप केला. बेनकर कुटुंबातील एकूण 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातून हे सर्वजण बरे होऊन घरी परतले आहेत.
ठकूबाई बेनकर आजी वारकरी संप्रदायाच्या असून त्यांनी तब्बल 23 वेळा आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाची पायी वारी केली आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना सातत्याने मी विठ्ठलाचा जप करत होते. तसेच माझ्या परिवारानेदेखील वेळोवेळी सकारात्मक विचार करण्यास सांगितले. विठ्ठलाची कृपा असल्यामुळे या महाभयंकर कोरोना संसर्गातून मुक्तता झाल्याचे त्या सांगतात.


























































