खुनी हल्ला, अपहरणप्रकरणी आमदार पुत्राला अखेर बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयात घुसून कामगारांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तसेच सुपरवायझरचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सूत्रधार आमदार पुत्राला अखेर दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ याच्यासह चारजणांना पोलिसांनी रत्नागिरीतून जेरबंद केले. पिंपरी न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आमदार पुत्र सिद्धार्थ अण्णा बनसोडे (वय 21, रा. काकडे रेसिडेन्सी, चिंचवड, स्टेशन), रोहित दुर्गेश पंद्री (वय 25, रा. साईबाबानगर, चिंचवड स्टेशन), सावंतकुमार रमेश सलादल्लू (वय 48, रा. लिंक रोड, चिंचवड स्टेशन), सतीश दशरथ लांडगे (वय 40, रा. राहिनाम निवास, कासारवाडी) अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी सिद्धार्थ बनसोडे याच्यासह 17 ते 18 जणांच्या टोळक्याने 11 मे रोजी आकुर्डी येथील एजी इन्व्हायरो इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात शिरून तीन कामगारांवर खुनी हल्ला केला. दुसरी घटना 12 मे रोजी घडली. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या मोबाईलवरील संभाषणात एजी इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे सुपरवायझर तानाजी पवार हे आमदार बनसोडे यांना उलटे बोलल्याचा आरोपींचा समज झाला. त्यातून टोळक्याने हेडगेवार भवन, आकुर्डीतील कार्यालयातून पवारांचे अपहरण केले. त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणले. तिथे सिद्धार्थ बनसोडे आणि टोळक्याने पवार यांना लथा-बुक्क्यांनी, चामडी पट्टा, रॉड, दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थने लोखंडी चॉपरने मारून पवारांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिद्धार्थसह टोळक्यावर अपहरण, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी यापूर्वी नऊ आरोपींना अटक झाली. मात्र, पंधरा दिवस उलटूनही आमदार पुत्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांची तीन पथके सिद्धार्थ याच्या मागावर होती. अखेर सिद्धार्थ याच्यासह चारजणांना बुधवारी रात्री रत्नागिरी येथे जेरबंद करण्यात आले. चौघा आरोपींना गुरुवारी (दि. 27) पिंपरी न्यायालयात हजर केले असता 30 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अन् पोलीस आयुक्त पत्रकारांवरच भडकले

एरवी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना सौजन्याने आणि दिलखुलासपणे उत्तर देणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आज पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. गोळीबार हा पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाला हे तपासात स्पष्ट झाले का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पोलीस आयुक्त चांगलेच भडकले. तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली कारवाई करूनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कोणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करून पाठवले आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच मी जे बोलतो तेच करतो, कोणाचाही दबाव मी घेत नाही. गुन्हा करणाऱ्यांवर मी कारवाई करतोच, असा दावाही त्यांनी केला.

आरोपींकडून पोलिसांची दोन आठवडे दिशाभूल

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली होती. मात्र, आमदार पुत्राने दोन आठवडे पोलिसांना चकवा दिला. तो चार साथीदारांसह रायगड जिल्ह्यातील उरण येथे लपून बसला होता. मोबाईलच्या आधारे तपास करणाऱ्या पोलिसांना सिद्धार्थ सातारा, सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक तेथे गेले, परंतु त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. आरोपी सतत मोबाईल बदलत होते. आरोपी उरण येथे असल्याची खबर मिळताच पोलीस तेथे गेले. मात्र, पोलीस आपला शोध घेत उरणला आल्याची कुणकुण आमदार पुत्राला लागली. त्याने उरण येथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी न्यू पनवेल-वाकडी येथील एका फार्म हाउसवर गेल्याचा बनाव रचला. प्रत्यक्षात आरोपांनी रत्नागिरीकडे पलायन केले होते. वाकडी येथे पोलीस गेले असता चौकशीत आरोपींचा बनाव त्यांच्या लक्षात आला. एका केअरटेकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी रत्नागिरीला गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तातडीने आरोपीचा पाठलाग सुरू केला. माग काढत असतानाच आरोपी रत्नागिरीतील कोळंबे-लक्ष्मीनगर येथील श्रमसाफल्य