>> प्रसाद ताम्हणकर
वैज्ञानिकांनी केलेल्या अनुमानानुसार 2025 सालापर्यंत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनावश्यक अशा 78 मानवी अवयवांची कस्टमाईज थ्रीडी प्रिंट बाजारत उपलब्ध होऊ शकणार आहे. अर्थात हृदय, किडनी, मेंदू अशा काही महत्त्वाच्या अवयवांची थ्रीडी प्रिंट बनवणे अजूनही वैज्ञानिकांना शक्य झालेले नाही. असे असले तरी 1980 साली गवसलेल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने आज जबडय़ाची हाडे आणि कवटीचा काही महत्त्वाचा भाग, दंतप्रत्यारोपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टींत यश मिळवण्यात आले आहे. औद्योगिक वापरापासून सुरू झालेली थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाची सुरुवात आज मानवी जीवनाला सुरक्षा देण्यापर्यंत पोहोचली आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान अजूनही उत्तुंग झेप घेणार, यात शंका नाही.
कोणत्याही वस्तूची हुबेहूब प्रतिमा तयार करणे हे थ्रीडी प्रिंटिंगचे वैशिष्टय़ आहे. या अनोख्या तंत्रज्ञानाने जगातील सर्वच क्षेत्रांना भुरळ पाडली आहे. दुचाकी आणि चारचाकींचे विविध पार्टस् थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनवण्यास सुरुवात होऊन आता बराच काळदेखील लोटला आहे. मात्र निरोगी मानवी आरोग्यासाठी अहोरात्र झटणारे वैद्यकीय क्षेत्र आणि थ्रीडी प्रिटिंग तंत्रज्ञानाने हातात हात घालून चालण्यास सुरुवात केली आणि अनेक विस्मयकारक शोधांचा उगमच सुरू झाला आहे. आजवर जे जे असंभव मानले जात होते असे अनेक शोध आता संभव होऊ लागले आहेत. वैज्ञानिकांनी नुकतेच एका थ्रीडी प्रिंटेड अशा छोटय़ाशा बायोरिऍक्टरमध्ये ‘सेल्फ ऑर्गनायझिंग ब्रेन टिश्यू’ बनवण्यात यश मिळवले आहे. या ब्रेन टिश्यूंना ‘ऑर्गेनाइड्स’ म्हणूनदेखील ओळखले जाते. आता या नव्या ‘सेल्फ ऑर्गनायजिंग ब्रेन टिश्यू’च्या शोधाच्या मदतीने मेंदूची संरचना, त्याची विविध कार्ये आणि मेंदूसंबंधातील अनेक आजारांचा अभ्यास करणे अत्यंत सुलभ होणार आहे.
अशा प्रकारच्या अभ्यासासाठी याआधी शास्त्र्ाज्ञांना एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा तयार करावी लागत असे, ज्यात या टिश्यूजची निर्मिती करून त्यांना विकसित केले जात असे. या तंत्रज्ञानात बायोरिऍक्टर्स आणि पेट्री डिशेस बनवण्यासाठी ‘मायक्रो फ्लुड्स’ना सूक्ष्म नलिकांमधून एखाद्या छोटय़ा चीपवर घेण्यात येत होते. या सर्वांसाठी प्रचंड खर्च तर येतच होता, पण खूप वेळदेखील वाया जात होता. मात्र आता या नव्या तंत्रज्ञानामुळे वेळेची आणि पैशाची दोन्हीची अमूल्य अशी बचत होणार आहे. यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास करणे शास्त्र्ाज्ञांना शक्य होणार आहे.
या ब्रेन टिश्यूजना विकसित करण्यासाठी एक खास असा थ्रीडी बायोरिऍक्टर बनवण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेल्या या बायोरिऍक्टरसाठी अवघा 5 डॉलर प्रतियुनिट खर्च आला आहे. हा खर्च पूर्वीचा शेकडो किंवा हजारो डॉलर्स प्रतियुनिटपेक्षा अत्यंत नगण्य आहे. या तंत्रज्ञानात ‘स्ट्रक्चर’ बनवण्यासाठी दातांच्या सर्जरीत उपयोगी येणाऱया ‘बायोकंपॅटिबल रेझीन’चा उपयोग करण्यात आला आहे. अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या ‘चिप’ला आधी ‘अल्ट्राव्हायोलेट’ प्रकाशात ठेवण्यात आले आणि त्यानंतर निर्जंतुक करण्यात आले. त्यानंतर या युनिटमध्ये जिवंत ‘टिश्यूज’ अथवा ज्यांना ‘सेल्स’ म्हटले जाते त्यांना ठेवण्यात आले. त्यानंतर या युनिटला काचेच्या आवरणाने बंद करण्यात आले. त्यानंतर या टिश्यूजचे विकसन, त्यांच्यावरती विविध औषधे, रसायने यांचे होणारे परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला.
सध्या उंदरासारख्या प्राण्यांवर आधी विविध लसी, औषधे यांचा प्रयोग करून त्यांची परीक्षा घेण्यात येते आणि त्यात समाधानकारक यश मिळाल्यावर त्यांची चाचणी मानवावर घेण्यात येते. मात्र काही वेळा सर्व सुरक्षा उपाय आणि काळजी घेऊनही मानवावर केलेला एखादा प्रयोग फसतो आणि त्यापासून जिवाला धोकादेखील उत्पन्न होऊ शकतो. मात्र आता या नव्या शोधामुळे कोणत्याही सजिवाला धोक्यात न घालता विविध औषधांच्या चाचण्या आणि त्यांचे मानवावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम यांचा परिणामकारक अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. हे या शोधाचे सर्वात मोठे यश आहे.























































