
>> दिलीप जोशी
ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच निधन झाले. उत्तराखंडमधील टिहरी धरण प्रकल्पासाठी होणारी जंगलतोड रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या ‘चिपको आंदोलना’ची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. या आंदोलनाच्या माध्यमातून बहुगुणा यांनी वनसंवर्धनाला एक नवा आयाम दिला. ‘पर्यावरण गांधी’ ही त्यांना बहाल केलेली पदवी म्हणूनच सार्थ ठरते.
चाळीसेक वर्षांपूर्वीची आठवण. आमचं साप्ताहिक एका मोठय़ा वृत्तसंस्थेत छापलं जायचं. तिथे अनेक क्षेत्रातले नामवंत वारंवार यायचे. एकदा लेख पूर्ण करण्यासाठी अगदी लवकर गेलो असताना साधारण दहा-साडेदहाच्या सुमारास तिथे एक व्यक्ती आली. डोक्याला शुभ्र रुमाल, खादीचा सदरा, लेंगा आणि तशीच गळय़ात अडकवलेली पिशवी. झपझप चालत ते गृहस्थ मी बसलो होतो त्या टेबलाशी थबकले. मी उभं राहत त्यांना म्हटलं,
‘नमस्ते, बहुगुनाजी’
‘पहचाना आपने?’
न ओळखायला काय झालं. तोपर्यंत सुंदरलाल बहुगुणांच्या ‘चिपको’ आंदोलनाचे पडसाद जगभर उमटले होते. त्यांचं सात्त्विक व्यक्तिमत्त्व, निरागस हास्य आणि नजरेतील आपण जे कार्य करतोय त्याबद्दलचं अतीव समाधान हे सारं आजही स्पष्ट दिसतंय. ते ज्यांना भेटायला आले होते त्यांना यायला थोडा वेळ असावा. ‘चहा’ घेणार का, असं विचारताच ते हसून ‘नाही’ म्हणाले. त्यांच्या हिमालयातील पर्यावरण रक्षणाच्या सूत्रातली पहिली ओळ ठाऊक होती. ‘क्या है जंगल के उपकार…’ आणि ते पुन्हा हसून बोलले, ‘मिट्टी, पानी और बयार’. त्यातील ‘बयार’ म्हणजे पवन किंवा हवा.
बस्स. सुंदरलाल बहुगुणा या ध्येयासक्त व्यक्तिमत्त्वाशी झालेली भेट ही एवढीच. कारण तेवढय़ात त्यांना ज्यांना भेटायचं होतं ते आले आणि माझ्या गाठी एक सुंदर अनुभव दाखल झाला.
याच काळात ज्येष्ठ पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर यांनी आमच्याकडे (‘श्री’ साप्ताहिकात) ‘हिमालयाची बोडन्ती’ असा स्पेशल रिपोर्ट केला होता. त्यात सुंदरलाल बहुगुणांचं हिमालयातील बेछूट जंगलतोडीविरुद्धचं आंदोलन आणि त्यातून पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी याचा लेखाजोखा मांडला होता. त्यावेळी आजच्यासारखं त्वरित माहिती देणारं ‘आंतरजाल’ (इंटरनेट) उपलब्ध नव्हतं. देशी-विदेशी अहवाल, माहिती, संदर्भ पुस्तकांमधून घ्यावे लागत असे. त्यासाठी मोठय़ा ग्रंथालयात तासन्तास घालवावे लागत. त्यातून एखादा अभ्यासपूर्ण ‘रिपोर्ट’ आकाराला यायचा. तसाच पुष्पाताईंचा होता.
चाळीस वर्षांहून अधिक काळापूर्वीची गोष्ट म्हणजे बहुगुणा त्यावेळी पन्नाशीत होते. प्रचंड उत्साहाने त्यांनी आणि त्यांच्या पत्नी विमला यांनी आताच्या उत्तराखंड या हिमालयाच्या कुशीत असलेल्या राज्यात ‘पर्वतीय नवजीवन मंडल’ या संस्थेचा आरंभ केला होता. हिमालयात या ना त्या कारणाने होणारा वनसंपत्तीचा विनाश आजच थांबवला नाही तर उद्याचं संकट फार मोठं असेल याची चाहुल बहुगुणांसारख्या सत्याग्रही मार्गाने कार्य करणाऱया समाजसेवकाला लागली होती.
याला पार्श्वभूमी होती ती स्वातंत्र्य चळवळीची. महात्मा गांधींच्या आंदोलनात देशभरातल्या कानाकोपऱयातून जी अनेक तेजस्वी व्यक्तिमत्त्व निर्माण झाली त्यापैकी उत्तराखंडामधल्या मरोडा या छोटय़ाशा गावात 9 जानेवारी 1927 रोजी बहुगुणांचा जन्म झाला. ते खऱया अर्थात हिमालयपुत्र होते आणि ‘पितृऋण’ फेडण्यासाठीच त्यांनी आयुष्य वेचलं. 94 वर्षांच्या प्रदीर्घ जीवनात त्यांचं एकच ध्येय होतं ते म्हणजे हिमालयातलं पर्यावरण अबाधित ठेवण्याचं.
गांधीजींच्या सहकाऱयांपैकी मीराबेन आणि ठक्कर बाप्पा यांच्याशी घनिष्ठ परिचय झाल्यावर बहुगुणांनाही राजकारणात उतरावंसं वाटलं होतं, परंतु ठक्कर बाप्पांच्या प्रेरणेतून ते वेगळय़ा विधायक कार्याकडे वळले आणि ते कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. त्यात त्यांना किती यश आलं याचा हिशेब मांडला तर कदाचित उत्तर फारसं उत्साहवर्धक येणार नाही, परंतु आपण करत असलेलं काम मानवजातीच्या आणि एकूणच निसर्गाच्या हिताचं आहे या मूळ जाणिवेतच समाधान दडलेलं असल्याने निराशा येण्याचं कारणच नव्हते. अशा विचारांचं यशापयश त्या कार्याचं महत्त्व समाज आणि सत्तेला असलेल्या आकलनावर अवलंबून असतं. बहुगुणा निरपेक्ष वृत्तीनेच कार्याला भिडले होते. त्यातच त्यांचं हिमालयाएवढं मोठेपण होतं.
उत्तराखंडमधेच नंतर ‘टिहरी’ धरण प्रकल्प आला. हे जगातलं सर्वात उंचावरचं (त्यावेळी तरी) धरण भागिरथी नदीवर बांधलं जाणार होतं. त्यासाठी प्रचंड जंगलतोड होणार होती. अनेक जैविक प्रजातींच्या विनाशाबरोबरच हजारो माणसंही विस्थापित होणार होती. सुंदरलाल बहुगुणांनी त्यांच्या शांततामय, पण ठाम मार्गाने प्रतिकार करायचं ठरवलं. शेकडो महिला हिमालयातील झाडांना कवटाळून ‘झाडं तोडू नका’ असं कळकळीने सांगू लागल्या. हेच ते जगप्रसिद्ध ‘चिपको’ आंदोलन. त्यांची घोषण मला आठवते ती अशी ‘आज हिमालय जागेगा, क्रूर कुल्हाडा भागेगा’ म्हणजे आज हिमालयाला जाग आल्यामुळे कुऱहाड घेऊन वृक्षतोड करायला आलेले पळून जातील.
अर्थात तसं घडलं नाही. टिहरी प्रकल्पाचा पहिला टप्पा 2006 मध्ये पूर्ण झाला. स्वतः बहुगुणा विस्थापित होऊन दुसरीकडे राहू लागले, मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. सरकारशी चर्चा, अनेक पंतप्रधानांच्या भेटीगाठी हे सारं सुरूच होतं. त्यांच्या या आंदोलनाची जगाने दखल घेतली. ‘फ्रेंड ऑफ नेचर’ किंवा ‘पर्यावरण गांधी’ असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं. त्यांचं म्हणणं सहजासहजी डावलता येणार नाही हे सत्ताधाऱयांनाही उमगलं. पण…
मतभेद असले तरीही हिंदुस्थानच्या सरकारने त्यांचा 1981 मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2009 मध्ये ‘पद्मविभूषण’ असा सन्मान केला. उत्तराखंडामधल्या सरकी येथील ‘आयआयटी’ने त्यांना 1989 मध्ये समाजकार्याविषयीची मानद ‘डॉक्टरेट’ पदवी प्राप्त केली.
सुंदरलाल बहुगुणा अखेरपर्यंत हिमालयाचा विचार करत राहिले. 8 मे रोजी त्यांना ‘कोविड’ने ग्रासलं आणि 21 मे 2021 रोजी त्यांची ध्येयवादी जीवनयात्रा संपली. त्यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं वर्णन ‘निसर्गरक्षक’ या अत्यंत योग्य शब्दांत केलं. आज आपण पर्यावरण ऱहासाचा पृथ्वीच्या प्रकृतीवर किती विपरीत परिणाम होतोय हे पाहतोच आहोत. अशा वेळी पर्यावरण रक्षणासाठी आवाज उठविणाऱयांना सुंदरलाल बहुगुणांच्या अस्तित्वासाठी आणि माणूस यांच्या सहकार्याने छोटंसं कार्य करणाऱयांना दिलासा मिळत होता.
सुरुवातीला उल्लेख केलेली त्यांची काही क्षणांची भेट अशी प्रेरणादायी ठरली.
n [email protected]





























































