निर्धार कोरोनामुक्त गावाचा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15 जूनपर्यंत निर्बंध वाढवावे लागताहेत, पण या काळात ‘हे उघडा, ते उघडा नाहीतर रस्त्यावर उतरू’ असे म्हणणाऱयांनी कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही. तसा गैरसमज असेल तर तो मनातून काढून टाकावा. कोरोनायोद्धे म्हणून रस्त्यावर उतरा, कोरोनादूत म्हणून नको!

‘जी जनता माझ्यावर प्रेम करते, आपले मानते त्यांच्यावर निर्बंध लादणे, बंधने लादणे हे कटू काम मला तुमच्या काळजीपोटीच करावे लागत आहे. आपल्याला कोरोनासोबत राहायचे नाही, तर त्याच्यावर मात करायची आहे. म्हणूनच आजपासून आपण संकल्प करूया, निर्धार करूया की माझे घर, माझे गाव कोरोनामुक्त करीन. म्हणजे मग जिल्हा आणि अवघा महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल. महाराष्ट्र देशाला ‘कोरोनामुक्ती’ची दिशा दाखवेल, तिसऱया लाटेवर मात करील,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केले.

फेसबुक लाइव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविडची सध्यस्थिती, त्यावर मात करण्यासाठी अहोरात्र सुरू असलेले प्रयत्न, तिसऱया लाटेचा धोका आणि निर्बंध शिथिल होणार की नाही यावर सविस्तर भूमिका मांडली.

कोरोनाची दुसरी लाट शहरांमध्ये आटोक्यात येत असली तरी ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या हलकीशी वाढते आहे. ती संख्या कमी करायची असेल तर ‘कोरोनामुक्त गाव’ची संकल्पना अमलात आणावी लागेल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येक सरपंचाने ठरवले तर त्यांचे गाव निश्चितच कोरोनामुक्त होऊ शकते. हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी ते करून दाखवले. एवढेच कशाला सोलापूर जिल्हय़ातील ऋतुराज देशमुख आणि कोमलताई तर्फे या तरुण सरपंचांनीही त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. या मुलांना जर हे जमू शकते, तर आपल्याला का नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. या तिन्ही सरपंचांशी मी बोलणार असून त्या तिघांनाही फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधायला सांगणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. लाटेनंतरचे निर्बंध, मग मोकळीक हे असे टय़ूबलाइटसारखे उघडझाप आपल्याला नको आहे. जे काही असेल ते लख्ख प्रकाशासारखे. म्हणूनच ‘गाव कोरोनामुक्त’ करूया आणि देशाला दिशा दाखवूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

अनाथ बालकांसाठी योजना तयार होतेय

दुसऱया लाटेने धक्का दिला आहे. दुर्दैवाने अनेकांनी आपले प्रियजन, आप्तस्वकीय गमावले. या कोरोनाने अनेक बालकांचे मातृपितृ छत्रच हिरावून नेले. या अनाथ बालकांसाठी केंद्र सरकारने योजना जाहीर केली आहेच, पण राज्य सरकारही या बालकांना वाऱयावर सोडणार नाही. त्यांच्या आयुष्यातील वाटचाल पोरकी होऊ देणार नाही, अनाथ होऊ देणार नाही. त्या बालकांसाठी योजना तयार होतेय, लवकरच आम्ही ती जाहीर करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू

‘तौकते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला स्पर्श करून गेले. गेल्या काही दशकांतील हे भीषण चक्रीवादळ होते. या वादळाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा किनारपट्टीच्या भागात मोठे नुकसान केले. हे वादळ येत असताना मिनिटा मिनिटाला त्याची माहिती घेत होतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेण्यासाठी मी सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा दौरा केला. नुकसानभरपाईची घोषणा केली असून ती प्रत्यक्ष द्यायला सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीतील मदतीच्या निकषांबाबत मी बोललो आहे. चक्रीवादळ, पूर, दुष्काळ यासाठी केंद्राचे जे निकष आहेत, त्याचे परिमाण बदलायला पाहिजे. मात्र केंद्राचे निकष अपुरे पडत असले तरी त्यापलीकडे जाऊन कोकण तसेच किनारपट्टीच्या भागात मदत जाहीर करण्यात आली आहे. वादळासारखी संकटे आता दरवर्षी यायला लागली आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. धूपप्रतिबंधक बंधारे, भूमिगत वीजवाहक यंत्रणा उभारण्याला प्राधान्य द्यायला हवे. आपत्कालीन स्थितीसाठी पक्के निवारे बांधण्याची गरज आहे. अशा कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत केंद्र सरकारशी बोलतो आहोत. त्यांच्याकडूनही नक्कीच मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोना निर्बंधात मदत म्हणून 3 हजार 865 कोटींच्या निधीचे वाटप

कोरोनाच्या लढाईत मदत म्हणून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 2 लाख 14 हजार मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिवभोजनच्या 54 लाख थाळय़ांच्या माध्यमातून गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. 850 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात मदतनिधी जमा करण्यात आला असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 154 कोटी 95 लाखांचा निधी, घरेलू कामगारांसाठी 34 लाख 42 हजारांचा निधी, फेरीवाल्यांसाठी 52 कोटींचा निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदिवासींच्या खात्यातही काही लाखांचा निधी जमा करणे सुरू आहे. जिल्हाधिकाऱयांना 3 हजार 300 कोटींचा निधी मंजूर केला होता. प्रत्यक्षात 3 हजार 865 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. कोरोनाच्या संकटातही आपला महाराष्ट्र सुरक्षित राहायला हवा यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर

काहीजण असे म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबतदेखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते. आज राज्यात 18 हजारांच्या आसपास नवीन रुग्णसंख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. यंदा ही परिस्थिती सणासुदीच्या अगोदर आलेली आहे. 17 ते 19 सप्टेंबर 2020 मध्ये राज्यात साधारण एका दिवसात आढळणारी रुग्णसंख्या ही 24 हजार 800 होती. आता 26 मे रोजी 24 हजार 752 एवढे रुग्ण आढळलेले आहेत. आज साधारण ही संख्या 18 हजारापर्यंत आली आहे. म्हणजे अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, यावेळी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्क्यांवर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘माझा डॉक्टर’च्या प्रतिसादामुळे युद्ध जिंकणार याची खात्री

‘माझा डॉक्टर’ ही नवीन संकल्पना मांडली तिला यश येतेय. माझा डॉक्टर म्हणजे कुटुंबाचा डॉक्टर. या डॉक्टरना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असते. त्यांना मी आवाहन केलं. त्यांच्याशी संवाद साधला. वाडय़ा, वस्त्या, पाडय़ांतले, गल्ली, सोसायटीतील डॉक्टरांना आवाहन केलं. त्यांनी प्रतिसाद दिला. कोरोनाचे कोणते रुग्ण घरच्या घरी बरे होऊ शकतात, त्याचप्रमाणे कोणत्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल आवश्यकता आहे हे ओळखण्याची जबाबदारी या डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांना केलेल्या आवाहनानंतर त्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर हे युद्ध आपण जिंकणार याची खात्री पटत आहे.

लहान मुलांना आपल्यामुळे लागण होणार नाही याची काळजी घ्या

पहिल्या लाटेत वयोवृद्धांना अधिक लागण झाली. त्यानंतर दुसऱया लाटेत तरुणांना संसर्ग झाला. त्यामुळे येणारी तिसरी लाट ही बालकांमध्ये अधिक संसर्ग करेल असा काही तज्ञांचा अंदाज आहे. काही तज्ञांच्या मते घाबरण्याचं कारण नाही; कारण लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आपल्यापेक्षा अधिक असते. पण लहान मुलांमध्ये साथ आली तर ती आपल्याच माध्यमातून येणार आहे. त्यामुळे आपल्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना संसर्ग होता कामा नये हे लक्षात घ्या.

सवादोन कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

45 वयावरील नागरिकांची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. 18 ते 44 वयोगटातील जबाबदारी राज्याने घेतली आहे. असे 6 कोटी नागरिक आहेत, त्या प्रत्येकाला दोन डोस देण्यासाठी 12 कोटी डोसची गरज आहे. या डोसची किंमत एकरकमी देण्याची राज्याची तयारी आहे. त्यामुळे जसजसा पुरवठा वाढेल तसा लसीकरणाचा वेग वाढवू. लसीकरण 24 तास सुरू ठेवू असे सांगून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱया विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

रस्त्यावर उतरणे म्हणजे तिसऱया लाटेला निमंत्रण

रुग्णसंख्येनुसार काही जिल्हय़ांत निर्बंध कडक करू किंवा शिथिल करू. मात्र या काळात हे उघडा, ते उघडा… कोरोनाबिरोना काही बघणार नाही, रस्त्यावर उतरू असे जर कोणी म्हणत असेल तर कृपया तसे काही करू नका. संकट कमी झाले म्हणून घाईगडबडीत रस्त्यावर उतरू नका. उतरायचेच असेल तर कोरोनायोद्धा म्हणून उतरा, कोरोनादूत म्हणून नको. कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही. तसे वाटत असेल तर ते मनातून काढून टाका. रस्त्यावर उतरणे म्हणजे तिसऱया लाटेला निमंत्रण देणे ठरेल. म्हणून त्या लाटेचे निमंत्रक होऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

काैतुक सरकारचे नाही, जनतेचे आहे!

महाराष्ट्राच्या कोरोना लढय़ाचे जगभरातून काैतुक झाले. मात्र हे काैतुक सरकारचे नाही तर मायबाप जनतेचे आहे. सरकार काय करेल तर नियम लावेल, निर्बंध लावेल, पण जनतेच्या सहकार्याशिवाय ते निर्बंध यशस्वी होत नाहीत. जनतेचे सहकार्य मिळते आहे म्हणूनच कोरोनाचा हा लढा काबूत आणू शकलो आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. निर्बंध हटवावे लागतील, हळूवारपणे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणायलाच लागतील. पण मला चावीवाल्याची भूमिका करावी लागते आहे आणि त्यात काही अर्थ नाही. आपल्याला कोविडसोबत राहायचे नाही तर त्यावर मात करायची आहे हे विसरू नका, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बारावीच्या परीक्षेचे काय… केंद्र सरकारने देशासाठी धोरण आखावे!

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रातही कसे बदल झाले आहेत याचेही विवेचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. विद्यार्थ्यांना मूल्यांकन करून उत्तीर्ण करणार, पण बारावीच्या परीक्षेचे काय? आम्ही आढावा घेत आहोत आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ. मात्र 12 वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची दिशा देणारी असते. म्हणूनच त्याबाबत केंद्र सरकारने अवघ्या देशासाठी एकच धोरण आखायला हवे. कारण ज्या राज्यांत रुग्णसंख्या कमी तेथे परीक्षा होणार, जेथे संख्या जास्त तेथे परीक्षा रद्द होणार. या प्रकारात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी पुन्हा विनंती करणार, पत्रही लिहिणार की बारावीच्या परीक्षेबाबत एकच धोरण आखा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

वर्क फ्रॉम होमसारखे शिक्षण

कोविडमुळे शिक्षण क्षेत्राबाबतही नवे निर्णय घ्यावे लागतील. काही क्रांतिकारी निर्णय घ्यावेच लागतील, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वर्क फ्रॉम होमसारखेच शिक्षणाचेही करता येईल का यावर तज्ञांचा अभ्यास सुरू असून सगळे शिक्षण एका नेटवकिंगमध्ये कसे करता येईल याचाही विचार सुरू आहे.