अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या वास्तूंचा होणार अभ्यास, कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोलापूर जिह्यात निर्माण केलेल्या वास्तू, शिल्प, वाडा, बारवा, मंदिरे जीर्णोद्धारांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाकडून अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवी यांच्या नावाने अध्यासन केंद्राची निर्मिती होत आहे. अध्यासन केंद्रांतर्गत अहिल्यादेवी यांच्या जीवनकार्यावर संशोधन व अभ्यास होणार आहे. यामुळे नव्या पिढीला अहिल्यादेवींचे आदर्श महान कार्य समजणार असून, त्यातून त्यांना एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवी यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सोलापूर जिह्यात विशेषतः मंगळवेढा, सांगोला या भागात निर्मिती केलेल्या वास्तू, शिल्प, वाडा, बारवा, मंदिरे जीर्णोद्धारांचा अभ्यास व संशोधन केले जाणार आहे. पुरातत्त्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील आणि इतर तज्ञ संशोधकांकडून याचा अभ्यास होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्यादेवी यांनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्टय़ांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील, अशी पेठ कायम केली. सोलापूरदेखील वस्त्रोद्योग नगरी म्हणून परिचित आहे. यामुळेच विद्यापीठाकडून हॅण्डलूम युनिटची निर्मिती करून त्यासंदर्भात अभ्यासक्रम सुरू केला आहे. विविध प्रकारच्या हॅण्डलूम प्रॉडक्टची निर्मिती सुरू आहे. याच्याच आणखी विस्तारासाठी प्रयत्न सुरू असून ‘एमएसएमई’कडूनही मदत घेण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. अध्यासन केंद्र व स्मारक येथे अहिल्यादेवींचे शिल्प, लॅण्डस्केपमधून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.

जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादनाचा कार्यक्रम

कठीण काळात अहिल्यादेवी होळकर यांनी संकटांचा सामना करत खूप मोठे महान कार्य केले आहे. अशा या महान राज्यकर्त्या असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांची आज (31 मे) रोजी जयंती आहे. यानिमित्त विद्यापीठात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.